शिरुरचा उमेदवार देताना जातीचा विचार केला की मातीचा? तावडेंचा पवारांना सवाल

शिरुरचा उमेदवार देताना जातीचा विचार केला की मातीचा? तावडेंचा पवारांना सवाल


मुंबई : भाजपचे नेते आणि राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शिरुरचा उमेदवार देताना जातीचा विचार केला की मातीचा? असा सवाल विनोद तावडे यांनी शरद पवार यांना विचारला आहे.

काय म्हणाले विनोद तावडे?

“शरद पवार बोलले की, जातीसाठी नाही तर मातीसाठी मतदान करा. शरद पवारांच्या तोंडी हे वाक्य ऐकल्यावर लोकांना माहित असतं, त्यामागे ते काय म्हणतात.”, असे म्हणत विनोद तावडे पुढे म्हणाले, “शिरुरचा उमेदवार देताना काय विचार केला होता? मातीचा केला होता का जातीचा केला होता?”

तसेच, शरद पवारांना आता कळायला लागलंय की जातीच्या आधारावर आता मतं मिळणार नाहीत, असेही तावडे म्हणाले.

यावेळी विनोद तावडे यांनी अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, “अजित पवार म्हणतायत, भाजप साम दाम दंड भेद वापरतेय. अजित दादांना हे काही नवीन नाही. दादा आतापर्यंत हेच तर करत होते. मागच्या लोकसभा निवडणुकीत क्लिप त्यांची व्हायरल झाली होती. त्यात ते काय बोलले होते ते त्यांनी आठवावं. उगाच स्वतः करुन लोकांवर आरोप करु नये.”

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत आपल्याला काही माहित नसल्याचे मात्र विनोद तावडे यांनी सांगितले. “राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रवेशाबाबत मला माहित नाही. ते त्यांनी आधीच सांगितलं की मी राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही. त्यांच्या मुलाचा ते प्रचार करत असतील तर ते स्वाभाविक आहे.” असे ते म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI