लोकल ट्रेन सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ: सुरेश काकाणी

सध्या ब्रिटन आणि युके येथून आलेल्या स्ट्रेनबाबत आढावा घेतला जातोय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:56 PM, 20 Jan 2021
लोकल ट्रेन सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ: सुरेश काकाणी
mumbai local

मुंबईः मुंबई एमएमआर रिजनमधील कोरोनाचा आढावा घेऊन शाळा आणि लोकल ट्रेन सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलीय. सुरेश काकाणी यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते. (We Will Take a Decision Soon To Start Local Train: Suresh Kakani)

सध्या ब्रिटन आणि युके येथून आलेल्या स्ट्रेनबाबत आढावा घेतला जातोय. ब्रिटनमधील विमान सेवा सुरू झाली असून, रुग्ण संख्या आणखी वाढतेय का, याचा 15 दिवस आढावा घेतला जाणार आहे. महापालिकेनं हा आढावा घेतल्यावर राज्य सरकारला अहवाल दिला जाईल, त्यानंतर शाळा आणि ट्रेन सुरू करण्याचा विचार करू, असंही महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणालेत.

मुंबईतील लोकल सेवा सुरू करण्यासंदर्भात गांभीर्याने विचार

”लोकल सुरू करण्यासाठी आम्ही सर्व तयारी केली आहे. लवकरच मुंबई लोकल सुरू करण्यावर निर्णय होईल”, असं विधान राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं. त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. विशेष म्हणजे केंद्र सरकारही मुंबईतील लोकल सेवा सुरू करण्यासंदर्भात गांभीर्याने विचार करत आहेत. त्यामुळे मुंबईची लाईफलाईन असणारी लोकल ट्रेन (Mumbai Local Train) सामान्य प्रवाशांसाठी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

नव्या वर्षातील कोरोनाच्या रुग्णसंख्येवर पालिका प्रशासन नजर ठेवणार

गेल्या नऊ महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली मुंबईकरांची लाईफलाईन 15 डिसेंबर आणि त्यानंतर 1 जानेवारीपासून पूर्ववत सुरू होईल, अशी चर्चा होती. मात्र अद्याप याबाबत कोणतीही हालचाल होताना दिसत नाहीये. दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा या राज्यांत कोरोनाची दुसरी लाट आली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी खबरदारी घेतलीय. त्यामुळे लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू होण्याची शक्यता धूसर मानली जातेय. कोरोनाचा धोका पाहता नव्या वर्षातील कोरोनाच्या रुग्णसंख्येवर पालिका प्रशासन नजर ठेवणार आहे. यानंतरच लोकल सुरू करण्याबाबत राज्य सरकारला कळवले जाईल, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली होती.

We Will Take a Decision Soon To Start Local Train: Suresh Kakani