वंदेभारत कोकणात धावणार का ?
नागपूर ते बिलासपूर 'वंदेभारत' सुरू केली असून काल पहिल्याच ट्रेनला 323 प्रवाशांचे बुकींग होते. नागपूर हे वैद्यकीय सेवेसाठी हब म्हणून ओळखले जाते. तसेच व्यापार, पर्यटन आणि शिक्षणासाठीही लोक येथे येत असतात. शिवाय नागपूरात एम्स रुग्णालयास मान्यता दिल्याने सरकारी रूग्णालयाचा फायदा घेण्यासाठी प्रवासी नागपूरला येतील. त्यामुळे मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या प्रवाशांना ही ट्रेन साेयीची ठरणार आहे. मात्र महाराष्ट्रासाठी तिचा काय उपयोग असा सवाल केला जात आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच नागपूर ते बिलासपुर वंदेभारतचे उद्घाटन करण्यात आले. परंतू छत्तीसगडच्या बिलासपुरला वंदेभारत ट्रेन चालविण्याऐवजी मुंबई ते नागपूर वंदेभारत का सुरू केली नाही असा सवाल प्रवासी संघटनांनी केला आहे. मुंबईकरीता आधीच एक वंदेभारत दिली असून ती मुंबई सेंट्रल ते गांधीनगर चालविण्यात येत आहे. आता कोकणात वंदेभारत केव्हा चालविणार असा सवाल केला जात आहे.
नागपूर ते बिलासपुर वंदेभारतला पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. बिलासपुर हे छत्तीसगडमधील शहर असून त्याचा महाराष्ट्राला काही फायदा नाही, त्यामुळे ही ट्रेन नागपूर ते मुंबई का चालविली नाही असा सवाल प्रवासी संघटनेने केला आहे.
मुंबई ते नागपूर दुरांतो एक्सप्रेस धावत असून तिला उत्तम प्रतिसाद मिळत असतो. आता नागपूर ते बिलासपूर ‘वंदेभारत’ सुरू केली असून काल पहिल्याच ट्रेनला 323 प्रवाशांचे बुकींग होते. नागपूर हे वैद्यकीय सेवेसाठी हब म्हणून ओळखले जाते. तसेच व्यापार, पर्यटन आणि शिक्षणासाठीही लोक येथे येत असतात. शिवाय नागपूरात एम्स रुग्णालयास मान्यता दिल्याने सरकारी रूग्णालयाचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या प्रवाशांना ही ट्रेन साेयीची ठरणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.
मुंबई सेंट्रल ते गांधीनगर सेमी हायस्पीड वंदेभारत एक्सप्रेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी नुकतीच सोलापूर ते मुंबई वंदेभारत चालविण्याची घाेषणा केली होती. ही ट्रेन व्हाया पुणे चालविण्याची योजना आहे. देशभरात 400 शहरे वंदेभारतने जाेडण्याची घाेषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.
मुंबई ते शिर्डी साईबाबांच्या भक्तांसाठी ‘वंदेभारत’ चालविण्याची योजना आहे. पुणे ते अहमदाबाद वसई मार्गे पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने देखील ‘वंदेभारत’ चालविण्याची योजना असल्याचे मध्य रेल्वेच्या एका अधिकार्याने स्पष्ठ केले. तसेच कोकणात गोव्यासाठी आणि मुंबई ते नाशिक, पुणे, अमरावती, जालना अशा इंटरसिटीच्या मार्गावर देखिल भविष्यात वंदेभारत धावण्याची शक्यता आहे.
