वंदेभारत कोकणात धावणार का ?

नागपूर ते बिलासपूर 'वंदेभारत' सुरू केली असून काल पहिल्याच ट्रेनला 323 प्रवाशांचे बुकींग होते. नागपूर हे वैद्यकीय सेवेसाठी हब म्हणून ओळखले जाते. तसेच व्यापार, पर्यटन आणि शिक्षणासाठीही लोक येथे येत असतात. शिवाय नागपूरात एम्स रुग्णालयास मान्यता दिल्याने सरकारी रूग्णालयाचा फायदा घेण्यासाठी प्रवासी नागपूरला येतील. त्यामुळे मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या प्रवाशांना ही ट्रेन साेयीची ठरणार आहे. मात्र महाराष्ट्रासाठी तिचा काय उपयोग असा सवाल केला जात आहे.

वंदेभारत कोकणात धावणार का ?
vandebharat
Image Credit source: vandebharat
| Updated on: Dec 13, 2022 | 1:34 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच नागपूर ते बिलासपुर वंदेभारतचे उद्घाटन करण्यात आले. परंतू छत्तीसगडच्या बिलासपुरला वंदेभारत ट्रेन चालविण्याऐवजी मुंबई ते नागपूर वंदेभारत का सुरू केली नाही असा सवाल प्रवासी संघटनांनी केला आहे. मुंबईकरीता आधीच एक वंदेभारत दिली असून ती मुंबई सेंट्रल ते गांधीनगर चालविण्यात येत आहे. आता कोकणात वंदेभारत केव्हा चालविणार असा सवाल केला जात आहे.

नागपूर ते बिलासपुर वंदेभारतला पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. बिलासपुर हे छत्तीसगडमधील शहर असून त्याचा महाराष्ट्राला काही फायदा नाही, त्यामुळे ही ट्रेन नागपूर ते मुंबई का चालविली नाही असा सवाल प्रवासी संघटनेने केला आहे.

मुंबई ते नागपूर दुरांतो एक्सप्रेस धावत असून तिला उत्तम प्रतिसाद मिळत असतो. आता नागपूर ते बिलासपूर ‘वंदेभारत’ सुरू केली असून काल पहिल्याच ट्रेनला 323 प्रवाशांचे बुकींग होते. नागपूर हे वैद्यकीय सेवेसाठी हब म्हणून ओळखले जाते. तसेच व्यापार, पर्यटन आणि शिक्षणासाठीही लोक येथे येत असतात. शिवाय नागपूरात एम्स रुग्णालयास मान्यता दिल्याने सरकारी रूग्णालयाचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या प्रवाशांना ही ट्रेन साेयीची ठरणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.

मुंबई सेंट्रल ते गांधीनगर सेमी हायस्पीड वंदेभारत एक्सप्रेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी नुकतीच सोलापूर ते मुंबई वंदेभारत चालविण्याची घाेषणा केली होती. ही ट्रेन व्हाया पुणे चालविण्याची योजना आहे. देशभरात 400 शहरे वंदेभारतने जाेडण्याची घाेषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.

वंदेभारत ही ट्रेन नव्या युगाची ट्रेन मानली जात असून तिला ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तिची प्रवासी वाहण्याची क्षमता ही ‘शताब्दी एक्स्प्रेस’ पेक्षा अधिक आहे. पहिली वंदेभारत वाराणसी ते दिल्ली, दुसरी दिल्ली ते काटरा, तिसरी मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, चौथी दिल्ली ते चंदीगड, पाचवी चेन्नई ते म्हैसूर तर सहावी बिलासपूर ते नागपूर दरम्यान सुरू करण्यात आली आहे. वंदेभारतच्या 75 रेकची निर्मिती पहिल्या टप्प्यात होणार असून त्यात जरी चेअरकारचे डबे असले तरी तिची आसने आता अधिक आरामदायी करण्यात आली आहेत. त्यामुळे दिवसाच्या प्रवासासाठी त्या इंटरसिटी एक्स्प्रेस म्हणून चालविण्यात येतील. तर रात्रीच्या प्रवासासाठीची स्लिपरकोच वाली वंदेभारत दुसर्‍या फेजमध्ये तयार होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
पहिली ‘वंदेभारत ट्रेन’ 2018 मध्ये तयार करण्यात आली होती. सध्या देशातील चार रेल्वे कारखान्यात ‘वंदे भारत’ ट्रेनची निर्मिती सुरू असून लातूर येथील नव्या कारखान्यातही तिचे सूटे भाग आणि डबे तयार करण्यात येणार असल्याचे अलीकडेच रेल्वेमंत्री अश अलिकडेच वंदेभारत ट्रेनच्या देखभालीची जबाबदारी मध्य रेल्वेच्या वाडीबंदर आणि पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी येथील कोच डेपोेंना देण्यात आली आहे.
वंदेभारत ही विनाइंजिनाची 16 डब्यांची ट्रेन असून तिच्या दर एका डब्यामागे एक मोटरकोचचा डबा जोडलेला आहे. त्यामुळे तिच्या पन्नास टक्के चाकांना मोटरची ताकद मिळते. तिचा कमाल वेग प्रति तास 160 कि.मी. इतका आहे. तिच्या मोटरसह सर्व इलेक्ट्रीक पार्ट्स डब्याच्या खालच्या भागात बसविलेले आहेत. ही ट्रेन सुरू होताच अवघ्या सात सेंकदात वेग पकडू शकते.
1128 प्रवासी क्षमता 
या ट्रेनच्या मोटर असलेल्या कोचमध्येही प्रवासी सामावू शकतात, तसेच ही ट्रेन वीजेवर धावणारी असल्याने पॉवर जनरेटर कार जोडायची गरज राहत नाही, त्यामुळे तिची प्रवासी वाहण्याची क्षमता शताब्दी पेक्षा जादा आहे.  44  गुणिले 2 ड्रायव्हिंग ट्रेलर कोच 88 अधिक 78 गुणिले 12 नॉर्मल चेअरकार 936, अधिक 52 गुणिले 2 एक्झुकेटिव्ह चेअरकार 104 अशी एकूण 1128  इतकी असून ती शताब्दी एक्सप्रेसपेक्षा अधिक आहे.

मुंबई ते शिर्डी साईबाबांच्या भक्तांसाठी ‘वंदेभारत’ चालविण्याची योजना आहे. पुणे ते अहमदाबाद वसई मार्गे पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने देखील ‘वंदेभारत’ चालविण्याची योजना असल्याचे मध्य रेल्वेच्या एका अधिकार्‍याने स्पष्ठ केले. तसेच कोकणात गोव्यासाठी आणि मुंबई ते नाशिक, पुणे, अमरावती, जालना अशा इंटरसिटीच्या मार्गावर देखिल भविष्यात वंदेभारत धावण्याची शक्यता आहे.

Follow Us