Tv9 स्पेशल रिपोर्ट : सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, मविआला आमदार अपात्रतेच्या निकालावरुन शंका
सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी पंतप्रधान मोदींनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं..त्यावरुन महाविकास आघाडीनं घेरलंय..सत्तासंघर्षाच्या निकालाबद्दल काही वेगळं घडतंय का ? असा सवाल राऊतांनी केलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणपती बाप्पा आणि गौरीच्या दर्शनासाठी आले. त्यावरुन आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शंका उपस्थित केली. सत्तासंघर्षाच्या निकालासंदर्भात काही वेगळं घडतंय का?, असा सवाल संजय राऊतांनी केलाय. पंतप्रधान मोदींनी बुधवारी दिल्लीत सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गणपती बाप्पाची आरती केली. मराठमोळ्या पद्धतीत मोदी या आरतीत सहभागी झाले. ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं या भेटीवरुन शंका व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि शिंदेंची शिवसेना तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या बेंचसमोर आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष-चिन्हावरुनही निवडून आयोगाच्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे आणि शरद पवार सुप्रीम कोर्टात गेले आहेत. तेही प्रकरण सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोरच आहे.
विशेष म्हणजे चंद्रचूड सरन्यायाधीश पदावरुन 8 नोव्हेंबरला निवृत्त होत आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान 10 नोव्हेंबरच्या नंतरच होईल, अशी चिन्हं आहेत. त्यामुळे 8 नोव्हेंबर निवृत्ती होण्याआधीच सत्तासंघर्ष तसंच शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरुन निकाल येण्याची शक्यता आहे. मात्र अशा प्रकारे पंतप्रधानच, सरन्यायाधीशांच्या घरी जात असल्यानं ठाकरेंची शिवेसना, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शंका उपस्थित केली.
पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी जावू शकतात का?
आता प्रश्न हा आहे की, अशाप्रकारे पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी जावू शकतात का? किंवा पंतप्रधान आणि भारताचे सरन्यायाधीश या दोन्ही पॉवरफुल्ल पदावरील व्यक्ती एकमेकांना भेटू शकतात का? यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, 18 सप्टेंबर 2009 रोजीचा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह आणि तत्कालीन सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन यांच्या भेटीचे फोटो ट्विट करत, महाविकास आघाडीच्या नेत्यांचा समाचार घेतला.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूडजी यांच्याकडे काल पंतप्रधानांनी गणरायाची आरती केली आणि महालक्ष्मी पूजन सुद्धा केले. सरन्यायाधीश महाराष्ट्रातील आहेत. दिल्लीत खास महाराष्ट्रीयन व्यक्तीकडूनच ते दरवर्षी गणरायाची मूर्ती पूजेसाठी आणतात. पण अचानक इकोसिस्टीम अशी कार्यान्वित झाली की, जणू आभाळ कोसळले. फरक फक्त इतकाच आहे की, आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित रहायचे. पण, गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गेले तर इतका गहजब का? हिंदूत्त्वाला विरोध करता-करता आता गणपती आणि गौरी-महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी? प्रश्न गहन आहे. हा महाराष्ट्रीयन सणांचा, महाराष्ट्र धर्माचा, मराठी संस्कृतीचा गौरी-गणपतींच्या भक्ती आणि श्रद्धेचा…अपमान नाही का?”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
महाविकास आघाडी सवाल उपस्थित करत असली तरी…
पंतप्रधान मोदी आणि सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या भेटीनं महाविकास आघाडी सवाल उपस्थित करत असली तरी भेटीच्याच दिवशी लोकसभा सचिवालयानं कार्यालयांचं वाटप केलं. ज्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला कार्यालय दिलं आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकच खासदार असल्यानं कार्यालय मिळालेलं नाही. मात्र पवारांच्या राष्ट्रवादीचा उल्लेख राष्ट्रवादी असा करण्यात आलाय. तर शिंदेंच्या शिवसेनेचा उल्लेख शिवसेना शिंदे असा करण्यात आलाय म्हणजे लोकसभा सचिवालय मूळ राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मानते. निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष शिंदेना आणि राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांना दिलाय. अर्थात त्यावरुन सुप्रीम कोर्टात लढाई सुरु आहे. मात्र पंतप्रधान मोदीच सरन्यायाधीशांच्या घरी आल्यानं, राजकारण तापलंय.