निवडणुका जाहीर होताच महाविकासाआघाडीत बिघाडी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा काँग्रेसला दे धक्का
नागपूर जिल्ह्यातील आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीत (MVA) बिघाडीचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने काँग्रेसवर असहकार्याचा आरोप करत स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवली आहे.

आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर होताच नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडीचे चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) स्थानिक नेतृत्वाने काँग्रेसवर स्थानिक पातळीवर सहकार्याची भूमिका नसण्याचा थेट आरोप केला आहे. तसेच आता स्वबळावर लढण्यासाठी समविचारी पक्षांची तिसरी आघाडी करण्याची तयारी सुरू केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नागपूर जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी काँग्रेससोबतच्या पूर्वीच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुभवावर नाराजी व्यक्त केली. “मागील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो, त्याच धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याची आमची भूमिका आजही आहे. पण हे करत असताना काँग्रेस पक्षाने आम्हाला विधानसभेत सन्मानजनक वागणूक दिली नाही, जागा वाटपातही आम्हाला जागा दिल्या नाहीत. त्यामुळे काँग्रेस पक्षाची मानसिकता आम्हाला सोबत घेऊन जायची नसेल, तर आम्ही तिसरी आघाडी, म्हणजे समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीला समोर जाण्याची तयारी सुरू केली आहे,” असे कुंटे पाटील यांनी सांगितले.
तिसरी आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्याचा विचार
काँग्रेससोबत निवडणूक लढण्याला प्रथम प्राधान्य असले तरी, काँग्रेसकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे निवडणुकीच्या कामाला लागलेल्या राष्ट्रवादीने आता पर्यायी मोट बांधायला सुरुवात केली आहे. यामुळे आम्ही उद्धव ठाकरे यांची शिवसेना, बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष आणि इतर समविचारी पक्षांची मोट बांधून तिसरी आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्याचा विचार करत आहोत, असे कुंटे पाटील यांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण घटनाक्रमाची आणि स्थानिक राजकीय परिस्थितीची माहिती पक्षाचे वरिष्ठ नेते आणि विदर्भाचे संपर्कप्रमुख अनिल देशमुख यांच्याकडे देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आघाडी करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य नेतृत्वाने स्थानिक पातळीवर दिले आहेत. यावेळी प्रवीण कुंटे पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही टीका केली.
समविचारी पक्षांना घेऊन निवडणूक लढवू
“राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या, त्यांची पत्रकार परिषद ऐकली असता, त्यांची भाषा आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांची भाषा यात काही फरक जाणवला नाही. भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोगाचा काहीतरी साठ-लोट आहे, हे त्यावरून मला जाणवले,” असा गंभीर आरोप प्रवीण कुंटे यांनी केला. पहिले आम्ही महाविकास आघाडी म्हणून प्राधान्य देऊ, पण काँग्रेसला आमची गरज वाटत नसेल, तर आम्ही समविचारी पक्षांना घेऊन निवडणूक लढवू,” या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहे.
सध्या काँग्रेसकडून कोणताही प्रस्ताव न आल्याने, नागपूर जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यातील संबंध कसे राहतात आणि महाविकास आघाडीचे भवितव्य काय असते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
