राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव, 11 आणि 12 तारखेला जमावबंदी आदेश

बुलडाणा प्रशासनानं राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सिंदखेडराजामध्ये जमावबंदी आदेश लागू केला आहे. (Rajamata Jijau Birth Anniversary)

  • गणेश सोळंकी, टीव्ही 9 मराठी, बुलडाणा
  • Published On - 13:05 PM, 11 Jan 2021
Rajamata Jijau Birth Anniversary
राजमाता जिजाऊ जन्मस्थान, सिंदखेड राजा

बुलडाणा: देशासह राज्यात कोरोना विषाणू संसर्ग झाल्यानंतर राज्य सरकारनं सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध आणले आहेत. राज्य सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक आणि महापुरुषांच्या जयंती, स्मृतिदिन कार्यक्रम मर्यादित स्वरुपात साजरे करण्याचे आवाहन केले होते. राष्ट्रमाता जिजाऊ  यांच्या जयंतीनिमित्त बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे दरवर्षी शिवभक्त मोठ्या प्रमाणावर जमा होतात. या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्हा प्रशासनानं सिंदखेड राजामध्ये 11 आणि 12 जानेवारीला जमावबंदी आदेश लागू करण्याचे आदेश दिले आहेत. (Buldana Administration implemented curfew in Sindhkhed Raja on Rajmata Jijau Birth Anniversary)

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे राजमाता जिजाऊ यांचे जन्म स्थान आहे. बुलडाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा येथील जिजाऊ जन्मोत्सववर कोरोना आजाराचे सावट असल्याने शासनानं खबरदारी घेतली आहे. शासनाने 11 आणि 12 जानेवारीला 144 कलम अंतर्गत जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. याबाबतच्या सूचना अपर जिल्हादंडाधिकारी बुलडाणा यांनी जारी केल्या आहेत. जिजाऊ जन्मोत्सवादरम्यान परिसरात गर्दी होणार नाही याबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्याबाबत प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत.

सिंदखेड राजामध्ये 144 कलम लागू

सिंदखेड राजा येथे दरवर्षी मराठा सेवा संघाच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील जिजाऊ जन्मोत्सव सोहळयाचे आयोजन करण्यात येते. या जन्मोत्सव सोहळयात राज्यातून तसेच संपूर्ण भारतासह जगभरातील जिजाऊ भक्त सहभागी होत असतात. जिजाऊ सृष्टी येथे मराठा सेवा संघाचे वतीने विविध कार्यक्रम होतात तर राजवाडा परिसरात जन्मोत्सव कार्यक्रम आयोजित केला जातो. जिजाऊ जयंतीनिमित्त सिंदखेड राजा येथे ठिकाणी लाखोंच्या संख्येने जिजाऊ भक्त येत असतात. मात्र, या वर्षी कोविड – 19 आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण सिंदखेडराजा शहरात आणि परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.

प्रशासनाचे गर्दी टाळण्याचं आवाहन
बुलडाणा जिल्हा प्रशासनाकडून कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिजाऊ भक्तांना सिंदखेड राजा परिसरात गर्दी न करण्याचं आवाहन केले आहे. जिजाऊ जन्मोत्सवादरम्यान परिसरात गर्दी टाळावी, असे आवाहन देखील प्रशासनाने केले आहे. प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यापासून सर्वच धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम मर्यादित स्वरुपात करण्यात आहेत. त्याप्रमाणं राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवावेळी देखील नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलेय.

संबंधित बातम्या:

राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाची दुरवस्था, विकास कामे सुरु करण्याची शिवप्रेमींची मागणी

राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव, सिंदखेड राजात जय जिजाऊंचा जयघोष

(Buldana Administration implemented curfew in Sindhkhed Raja on Rajmata Jijau Birth Anniversary)