धान्य घोटाळा : नांदेडच्या निवासी जिल्हाधिकाऱ्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

सुरुवातीला जवळपास दोन कोटी रुपयांचा असलेला हा धान्य घोटाळा पोलीस तपासात वाढतच गेला. याच घोटाळ्याने आता गंभीर वळण घेतलंय. नांदेडचे निवासी जिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांनी या घोटाळ्यात अटकपूर्व जामिनाची मागणी केली होती. मात्र बिलोलीच्या न्यायालयाने वेणीकर यांना जामीन देण्यास नकार दिलाय.

धान्य घोटाळा : नांदेडच्या निवासी जिल्हाधिकाऱ्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

नांदेड : अन्न-धान्यामुळे कुणाचीही उपासमार होऊ नये म्हणून सरकारने स्वस्त दरात धान्य देण्याची योजना सुरू केली. मात्र नांदेडमध्ये गरीबांच्या तोंडचा हा घास हिराऊन घेऊन तो काळ्या बाजारात विकणारं एक मोठे रॅकेट गेल्या वर्षी जुलैमध्ये पोलिसांनी उघडकीस आणलं. सुरुवातीला जवळपास दोन कोटी रुपयांचा असलेला हा धान्य घोटाळा पोलीस तपासात वाढतच गेला. याच घोटाळ्याने आता गंभीर वळण घेतलंय. नांदेडचे निवासी जिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांनी या घोटाळ्यात अटकपूर्व जामिनाची मागणी केली होती. मात्र बिलोलीच्या न्यायालयाने वेणीकर यांना जामीन देण्यास नकार दिलाय.

नांदेड जिल्ह्यातील कृष्णूर इथल्या मेगा इंडिया कंपनीत जुलै 2018 मध्ये पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत सरकारी धान्याचे दहा ट्रक धान्य या कंपनीत काळ्या बाजारात विकण्यासाठी आणले होते. एक कोटी 80 लाख रुपयांचा हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत गुन्हा दाखल केला. त्यानंतर या धान्य घोटाळ्याचा तपास सीआयडीकडे वर्ग झाला.

सीआयडीने या घोटाळ्यातील बड्या व्यापाऱ्यांना अटक केली. याच घोटाळ्यात तत्कालीन पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर दोषी असून त्यांना जामीन देऊ नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त आरेफ पठाण यांनी न्यायालयात केली. बिलोली इथल्या न्यायालयाने वेणीकर यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. त्यामुळे सीआयडी त्यांना आता कधीही अटक करू शकते. या सगळ्या प्रकाराची चाहूल असल्याने गेल्या महिनाभरापासून वेणीकर हे सुट्टीवर असून नुकतीच त्यांनी आपली सुट्टी वाढवल्याची माहिती आहे.

या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशाची सरकारी वकील आशिष कुंडलवाडीकर यांनी पत्रकारांना माहिती दिली. गोर गरीबांसाठी असलेल्या स्वस्त धान्याचा माल काळ्या बाजारात बिस्कीट मैदा तयार करणाऱ्या कंपन्यांना विकण्याचं हे मोठं रॅकेट होतं. विशेष म्हणजे याच विषयावर स्वतः माजी खासदार अशोक चव्हाण यांनीही भाष्य करत जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढल्याची टीका केली होती.

या घोटाळ्यात प्रमुख आरोपी असलेले चार जण तब्बल दहा महिने फरार होते. फरार असलेल्या या चारही आरोपींना मे महिन्यात सीआयडीने अटक केली. धान्य घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेल्या अजय बाहेती, राजू पारसेवार, जयप्रकाश तापडीया आणि ललित खुराणा हे चार बडे व्यावसायिक अद्याप तुरुंगात आहेत. तसेच सीआयडीने याच घोटाळ्यात नांदेडच्या पुरवठा विभागातील चार कर्मचाऱ्यांना अटक केली. दरम्यान, या घोटाळ्यात जिल्ह्यातील काही तहसीलदार आणि अन्य महसूलचे काही कर्मचारी सहभागी असल्याची माहिती तपासात समोर येत आहे.

नांदेडमधील अनेक व्यापारी यात गुंतले आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती वाढतच जात असल्याने खळबळ उडाली आहे. गोर गरीब लोकांचा तोंडचा घास पळवणाऱ्या या धेंडांची मालमता जप्त करून कठोर कारवाई करावी अशी मागणी आता होत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *