नाशिकमध्ये फटाके फोडण्यास बंदी; 10 नोव्हेंबरपासून बंदी आदेश लागू

राज्यातील कोरोनाचं संकट पाहता नाशिकमध्ये फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. येत्या 10 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून हा बंदी आदेश लागू होणार असून कंटेन्मेंट झोन परिसरात फटाके फोडल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

  • विठ्ठल भाडमुखे, टीव्ही 9 मराठी, नाशिक
  • Published On - 13:09 PM, 8 Nov 2020
मुंबईतील फटाक्यांवरी निर्बंधांविषयी बोलताना फटाके व्यावसायिक मिनेश मेहता यांनी हे निर्बंध चांगले असल्याचं म्हटलं आहे.

नाशिक: राज्यातील कोरोनाचं संकट पाहता नाशिकमध्ये फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. येत्या 10 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून हा बंदी आदेश लागू होणार असून कंटेन्मेंट झोन परिसरात फटाके फोडल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. (ban on firecrackers in nashik)

नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी हे बंदी आदेश लागू केले आहेत. नाशिकमध्ये येत्या 10 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून कुणालाही फटाके फोडता येणार नाही. तसेच कंटेन्मेट झोन परिसरात फटाके फोडण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. फटाके फोडणाऱ्यावर कारवाई करण्याचा इशाराही मांढरे यांनी दिला आहे.

राज्यातील कोरोनाचं संकट अद्यापही गेलेलं नाही. त्यातच थंडी वाढल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची चिन्हे आहेत. शिवाय दिवाळीत फटाके फोडल्यास कोरोनाचा संसर्ग आणि वाढण्याची शक्यता असून कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून नाशिकमध्ये फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन जनतेला केलं होतं. डेथ ऑडिट कमिटी आणि टास्क फोर्सशी बोलणं झालं. त्यांनीही थंडीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने यंदा दिवाळीत फटाके फोडण्यास मज्जाव करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीतही हा विषय चर्चेसाठी आला होता. त्यातही मुख्यमंत्र्यांपासून सर्वांचं फटाके विरहित दिवाळी साजरी केली जावी असं म्हणणं पडलं. त्यामुळे राज्यातील जनतेने यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी, असं आवाहन राज्य सरकारच्यावतीने करण्यात येत असल्याचं टोपे यांनी सांगितलं होतं. फटाक्यांमुळे कुणालाही श्वसनाचा त्रास उद्भवणार नाही, याची जबाबदारी आपलीच असल्याचंही ते म्हणाले होते.

थंडीमध्ये इन्फ्लुएन्झा सारखे आजार वाढतात. त्यामुळे तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून खासगी डॉक्टरांनी तापाच्या रुग्णांचे लक्षणानुसार तातडीने चाचण्या करण्यासाठी प्राधान्य देण्याचे समितीने सुचविले आहे. त्यानुसार राज्यभरात फिव्हर सर्वेलन्स वाढविणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. (ban on firecrackers in nashik)

 

संबंधित बातम्या:

यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा; राजेश टोपेंचं आवाहन

आशा स्वयंसेविकांची दिवाळी गोड होणार, 4 महिन्यांचा वाढीव मोबदला देण्यासाठी 57 कोटी वितरित : राजेश टोपे

(ban on firecrackers in nashik)