नाशिक महापालिका स्थायी समिती निवडणुकीत रंगत; कोण मारणार बाजी?

त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वपक्षीय विरुद्ध भाजप अशी लढत बघायला मिळू शकते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:53 PM, 23 Feb 2021
नाशिक महापालिका स्थायी समिती निवडणुकीत रंगत; कोण मारणार बाजी?
Nashik municipal corporation

नाशिक: महापालिकेची स्थायी समितीची निवडणूक यंदाच्या वेळी रंगतदार होण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या एका निर्णयाने शिवसेनेला मिळालेल्या एका अतिरिक्त जागेमुळे स्थायी समितीमधील संख्याबळ आता भाजप आणि सेनेकडे समसमान झालेय. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वपक्षीय विरुद्ध भाजप अशी लढत बघायला मिळू शकते. (Nashik Municipal Corporation Standing Committee election; Who will win?)

नाशिक स्थायी समितीत एकूण 16 सदस्य संख्या

नाशिक स्थायी समितीत एकूण 16 सदस्य संख्या आहे, यात भाजपकडे 8 तर महाविकास आघाडीकडे सात जागा आहेत, तर एक जागा मनसेकडे आहे. मनसेला आपल्याकडे वळवून संख्याबळ समान करून ही निवडणूक चुरशीची करण्याची महाविकास आघाडीची रणनीती आहे, यासाठी मनसेला देखील सोबत घेण्याची सेनेची तयारी आहे.

नाशिक महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता

सध्या नाशिक महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असल्याने स्थायी समितीवर देखील भाजपचं वर्चस्व आहे. यंदाच्या निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीची रणनीती यशस्वी ठरली तर स्थायी समितीत असलेली सत्ता गमवावी लागणार आहे. मात्र महाविकास आघाडीत बिघाडी होते का यावर भाजपाचे गणित अवलंबून असणार आहे.

दोन पक्षांनी सत्तेच्या चाव्या आमच्याकडे राहणार असल्याचा दावा केल्यानं चूरस

दोन पक्षांनी सत्तेच्या चाव्या आमच्याकडे राहणार असल्याचा दावा केल्याने मोठी चूरस निर्माण होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीकडे सर्वांचे विशेष लक्ष लागलंय. मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने काही नवीन समीकरणं बघायला मिळणार का हे निवडणुकीच्या वेळेस स्पष्ट होणार आहे.

राष्ट्रवादीची स्वबळाची तयारी

आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्ष संघटन अधिक मजबूत करत कामाला लागावे. तसेच वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होईल याची वाट न बघता प्रसंगी नाशिक महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचीदेखील तयारी ठेवा, असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत 14 फेब्रुवारी रोजी नाशिक शहरातील राष्ट्रवादी भवन मुंबई नाका येथील कार्यालयात आढावा बैठक पार पडली, यावेळी भुजबळांनी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.

नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचा – राऊत

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुढील नाशिक महापौर शिवसेनेचा होईल, अशी राजकीय भविष्यवाणी केल्यानंतर नाशिकच्या राजकीय वर्तुळात चांगलीच दंगल सुरु झालीय. राऊत कुठल्या जोरावर ही गोष्ट बोलताहेत हीच कल्पना विरोधकांना येत नाहीये. त्यामुळेच राऊतांच्या दाव्याविषयी तर्कवितर्क लावण्यास उधाण आलंय. तिकडं मनसेही नाशिक मनपा निवडणुकीची कसून तयारी करतेय. भाजपनं मनसेचे अनेक नगरसेवक पळवले. त्यामुळं स्थानिक पातळीवर मनसैनिकांमध्ये भाजपबद्दल रोष आहे. मात्र, असं असलं तरी मनसेची भूमिका कृष्णकुंजवरच ठरणार आहे.

नाशिक मनपामध्ये पक्षीय बलाबल

भाजप – 65
शिवसेना – 35
राष्ट्रवादी – 6
काँग्रेस – 6
मनसे – 6
रिपाई – 1

संबंधित बातम्या :

बाळासाहेब, पवारांचे बोट धरून पुढे आलो; पवारांचे वय मोजू नये: संजय राऊत

नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचाच; संजय राऊतांचा दावा

Nashik Municipal Corporation Standing Committee election; Who will win?