पेट्रोल-डिझेल दरवाढीचा लग्नकार्यातूनही निषेध, नवरदेव वऱ्हाड्यांसह बैलगाडीने विवाहस्थळी

बेंदीपाडा ते सरलेदिगर या गावामधले अंतर तीन किमी पार करण्यासाठी नवरदेवासह वऱ्हाडी मंडळींनी चक्क बैलगाडीचा वापर केला (Nashik Wedding Groom bullock cart)

  • विठ्ठल भाडमुखे, टीव्ही 9 मराठी, नाशिक
  • Published On - 16:42 PM, 16 Mar 2021
पेट्रोल-डिझेल दरवाढीचा लग्नकार्यातूनही निषेध, नवरदेव वऱ्हाड्यांसह बैलगाडीने विवाहस्थळी
नाशिकमधील कळवण तालुक्यातील नवरदेव कुटुंबासह बैलगाडीने लग्नस्थळी

नाशिक : पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याचा वाहनचालकांना मोठा फटका बसला. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात नवरदेव आणि वऱ्हाडी चक्क बैलगाडीने लग्नस्थळी पोहोचले. त्यामुळे पाहुणे मंडळींना जुन्या काळातील लग्न समारंभाची आठवण झाली. कळवण तालुक्यात हा विवाह सोहळा चर्चेचा विषय ठरत आहे. (Nashik Wedding Groom family reaches Marriage hall on bullock cart)

पेट्रोल-डिझेलचे दर शंभरीच्या दिशेने

लग्न समारंभ म्हटला की नवरदेवाला एका दिवसासाठी आलिशान गाडी भाडे तत्त्वावर घेतली जाते. वऱ्हाडी आणि पाहुणे मंडळीही लग्न समारंभाच्या ठिकाणाचे अंतर बघून एसटी बस किंवा लक्झरी गाड्या करतात. यासाठी वरपक्षाच्या नातेवाईकांना मोठी रक्कम देखील मोजावी लागते. सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांच्या भाडे दरात वाढ झाली आहे. त्यामुळे गाड्यांचे भाडे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहेत.

नवरदेवासह वऱ्हाडी मंडळी बैलगाडीने विवाहस्थळी

याचीच प्रचिती आणणारी एका लग्नाची गोष्ट समोर आली आहे. कळवण तालुक्यातील बेंदीपाडा येथे चंदुलाल बागुल आणि वंदना भोये यांचा विवाह सरलेदिगर येथे संपन्न झाला. या विवाहाचे वैशिष्ट म्हणजे बेंदीपाडा ते सरलेदिगर या गावामधले अंतर तीन किमी आहे. बेंदीपाडा येथून विवाहस्थळी पोहोचण्यासाठी नवरदेवासह वऱ्हाडी मंडळींनी चक्क बैलगाडीचा वापर केला. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

जुन्या काळातील वाद्यांचीही संगत

बैलगाडीने नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळी आल्याने संपूर्ण दिवसभर याचीच चर्चा सुरु होती. मात्र या अनोख्या विवाह सोहळ्यामुळे आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात जुन्या काळातील आठवणीही ताज्या झाल्या. त्याचप्रमाणे या लग्नात जुन्या काळातील पिपाणी आणि संबळ यांसारखे वाद्य असल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

संबंधित बातम्या :

VIDEO | ना लग्न झालं, ना साखरपुडा, तरीही ‘गेली माझी बायको गेली’ का म्हणतायत पोरं, एकदम कडक!

अवघ्या दोन फुटांच्या अजीमशी लग्नासाठी तब्बल डझनभर मुलींची रांग, सलमानकडूनही भेटीचा प्रस्ताव!

(Nashik Wedding Groom family reaches Marriage hall on bullock cart)