मनसेचे धुळ्यात खळखट्याक…वीज बिल भरण्यासाठी जाचक त्रास देणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारला जाब

मनसेने धुळे शहरातील साक्री रोड भागात असलेल्या वाढीव वीज बिलप्रश्नी खळखट्याक आंदोलन केले. (MNS Dhule Mahadiscom Bills)

  • विशाल ठाकूर, टीव्ही 9 मराठी, धुळे
  • Published On - 16:47 PM, 24 Feb 2021
मनसेचे धुळ्यात खळखट्याक...वीज बिल भरण्यासाठी जाचक त्रास देणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारला जाब
मनसेचे धुळ्यात आंदोलन

धुळे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (MNS) धुळे शहरातील साक्री रोड भागात असलेल्या वाढीव वीज बिलप्रश्नी खळखट्याक आंदोलन केले. मनसेने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील अधीक्षक अभियंता यांच्या दालनात वाढीव वीज बिल तसेच वीज कनेक्शन कट करणाऱ्यांविरोधात खळखट्याक आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेने अधीक्षक अभियंता पौनिकर यांच्या दालनात त्यांना वीज कनेक्शन तोडल्याबद्दल जाब विचारला आणि त्यांच्या टेबलावर फुटाणे फेकत आंदोलन केले. (MNS workers protest at Dhule Mahadiscom office for electricity bills issue)

पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगण्यावरुन वाद

वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता पौनिकर यांनी पत्रकारांना दालनातून बाहेर जाण्यास सांगितल्यावर मनसेचे पदाधिकारी आणि पौनिकर यांच्यात वाद सुरू झाला. वीजबिल न भरणाऱ्या एका महिलेवर वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दबाव टाकत त्यांना बिल भरण्यास सांगितले. संबंधित महिनेने तिचे मंगळसूत्र गहाण ठेवून बिल भरले असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राची कुलकर्णी यांनी केला. प्राची कुलकर्णीय यांनी याविषयी अधीक्षक अभियंता यांना याबाबत जाब विचारला.यावेळी दागिने गहाण ठेवणे ही आमच्यासाठी गौण बाब असल्याचे उत्तर अधीक्षक अभियंत्यांनी दिल्याने संतप्त झालेल्या मनसैनिकांनी त्यांची खुर्ची फेकत निषेध व्यक्त केला.या संपूर्ण प्रकार नंतर मनसे च्या कार्यकर्ते वर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मनसेची ऊर्जा मंत्र्यांविरोधात तक्रार

राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि महावितरणच्या अधिकाऱ्यानं विरोधात डोंबिवली येथील मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. वीज बिल माफी संदर्भात खोटे आश्वासन देऊन नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप मनसेने या तक्रारीत केला आहे.

मनसेने तक्रारीत काय म्हटलं?

कोरोनाच्या महामारीमुळे देशभरात आणि विशेषत: महाराष्ट्रात 22 मार्च 2020 ते 8 जून 2020 दरम्यान अतिकठोर टाळेबंदी होती. या काळात महावितरणकडून ना वीज मीटर रिडिंगसाठी प्रतिनिधी पाठविण्यात आले, ना वीज देयके वितरित करण्यात आली. घरातच बंदिस्त झालेल्या जनतेला या कालावधीतल्या वीज वापरासाठी महावितरण कंपनीकडून अचानक वापरपेक्षा तिप्पट-चौपट रकमेची अवाजवी आणि भरमसाठ वीजबिले पाठवली गेली.

या वीजबिलांचे आकडेच इतके मोठे होते की ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसह शहरातील मध्यमवर्गीयांनाही भोवळच आली. कोरोना टाळेबंदीच्या दिवसांमध्ये व्यापार –उद्योग बंद होऊन असंख्य लोक बेरोजगार झालेले असताना आणि अनेकांच्या पगारात 25 ते 50 टक्के कपात झाल्यामुळे उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाले असताना वीजबिलांची भरमसाठ रक्कम भरणं बहुसंख्य नागरिकांना शक्यच नव्हतं.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह इतरही राजकीय पक्षांनी नागरिकांमधील संतापाची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे वीजबिलांबाबतच्या तक्रारी मांडल्या. त्यानंतर ऊर्जामंत्री, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि वीज कंपन्यांचे प्रमुख अधिकारी यांच्यात अनेकदा बैठकाही झाल्या. प्रत्येक बैठकीनंतर “वीज बिलात कपात करण्याबाबतचा निर्णय लवकरच घेऊ आणि नागरिकांना दिलासा देऊ” असं आश्वासन उर्जामंत्र्यांनी दिलं. तशा बातम्या सर्व प्रमुख वृत्तवाहिन्या आणि दैनिकांमध्ये प्रसिद्धही झाल्या होत्या.

ऊर्जामंत्री आपल्या शब्दाला जागतील आणि त्यांच्यामुळे वीज बिलांत कपात होऊन करोना संकटकाळात थोडासा आर्थिक दिलासा मिळेल, या आशेवर राज्यातील नागरिक असताना ऊर्जामंत्र्यांनी अचानक घुमजाव केलं आणि “प्रत्येक वीजग्राहकाला वीजबिल भरावेच लागेल” असं फर्मान काढलं.

संबंधित बातम्या:

ऊर्जामंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक, वाढीव वीज बिलासंदर्भात मनसेची पोलीस ठाण्यात तक्रार

वीज बिल माफीवर पटोले, राऊत हसं करुन घेतायत?

(MNS workers protest at Dhule Mahadiscom office for electricity bills issue)