नवी मुंबई मेट्रो डिसेंबर 2022 अखेर पर्यंत रुळावर धावणार

11.10 किमीच्या 11 स्थानकांसह तळोजा येथे आगार असलेलेल्या बेलापूर ते पेंधर या मार्गावर मेट्रोची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

  • हर्षल भदाणे पाटील, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई
  • Published On - 17:17 PM, 27 Feb 2021
नवी मुंबई मेट्रो डिसेंबर 2022 अखेर पर्यंत रुळावर धावणार

नवी मुंबई: सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या बेलापूर ते पेंधर या मार्ग क्र. 1 च्या जलद अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनची (महा मेट्रो) नियुक्ती करण्यात आलीय. त्यानुसार महा मेट्रोकडून 23 फेब्रुवारी 2021 रोजी प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता 20 तज्ज्ञ अभियंत्यांच्या गटाची स्थापना करण्यात आलीय. नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या आणि नवी मुंबईतील नोड परस्परांना अधिक सुलभरीत्या जोडले जावेत, या उद्देशाने सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत एकूण 4 उन्नत मार्ग (एलिव्हेटेड कॉरिडॉर) विकसित करण्यात येत आहेत. त्यांपैकी 11.10 किमीच्या 11 स्थानकांसह तळोजा येथे आगार असलेलेल्या बेलापूर ते पेंधर या मार्गावर मेट्रोची यशस्वी चाचणी घेण्यात आली. (Navi Mumbai Metro will run till the end of December 2022 )

निकषांचा विचार करून सिडकोकडून पर्याय शोधण्यास सुरुवात

परंतु सद्यस्थितीत मार्ग क्र. 1 वर उभारण्यात येणाऱ्या 11 स्थानकांपैकी 1 ते 6 स्थानकांच्या उभारणीचे काम काही तांत्रिक कारणांमुळे तसेच कोविड-19 च्या उद्भवलेल्या स्थितीमुळे अपेक्षित गतीने होत नव्हते. यामुळे सदर मार्गावरील उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करणे आणि प्रकल्पासाठी आर्थिक स्रोत निर्माण करणे, या निकषांचा विचार करून सिडकोने पर्याय शोधण्यास सुरुवात केली. यानंतर सर्वांत योग्य पर्याय म्हणून महा मेट्रोची निवड करण्यात येऊन या मार्गाचे काम महा मेट्रो यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रकल्पासाठी अभियंता म्हणून महा मेट्रो काम पाहणार

याच अनुषंगाने नवी मुंबई मेट्रो प्रकल्प पुरस्कर्ता म्हणून सिडको कायम राहणार असून, प्रकल्पासाठी अभियंता म्हणून महा मेट्रो काम पाहणार आहे. महा मेट्रो कंपनीस नुकत्याच यशस्वीरीत्या कार्यान्वित झालेल्या नागपूर मेट्रो टप्पा 1 आणि पुणे मेट्रो प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या मार्ग क्र. 1 आणि 2 च्या बांधणी, अंमलबजावणी आणि परिचालन आणि निगराणीचा अनुभव आहे. यामुळे नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. 1 वरील उर्वरित कामांची जलदरीत्या अंमलबजावणी व्हावी याकरिता महा मेट्रोची नियुक्ती करण्याचा निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला आहे. डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महा मेट्रो, अश्विन मुद्गल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको यांसह सिडको आणि महा मेट्रोतील अभियंत्यांनी मेट्रो प्रकल्प स्थळाची पाहणी करून सद्यस्थितीचा आढावा घेतला. प्रकल्प पुरस्कर्ता म्हणून सिडको कायम राहणार असून, प्रकल्पासाठी अभियंता म्हणून महा मेट्रो काम पाहणार आहे.

नवी मुंबईकरांना आरामदायक प्रवासाचा एक उत्तम पर्याय निर्माण होणार

महा मेट्रोने या तज्ज्ञ गटाच्या मदतीने विविध उपक्रमांना प्रारंभ केला आहे. या तज्ज्ञ गटाकरिता तळोजा मेट्रो आगार येथे कार्यालयासाठी जागाही सिडकोकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएआरएस) यांचे सुरक्षाविषयक प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर मार्ग क्र. 1 वरील स्थानक 7 ते 11 दरम्यान साधारणत: डिसेंबर 2021 अखेरीस आणि स्थानक 1 ते 7 दरम्यान साधारणत: डिसेंबर 2022 अखेरीस वाणिज्यिक परिचालनास (प्रवासी वाहतुकीस) सुरुवात होणार आहे. सदर मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर नवी मुंबईकरांना लवकरच पर्यावरणस्नेही आणि आरामदायक प्रवासाचा एक उत्तम पर्याय निर्माण होणार आहे.

डिसेंबर 2022 अखेर पर्यंत मेट्रो रुळावर धावणार

बेलापूर ते पेंधर मेट्रो रेल्वेचे रखडलेले काम सिडको महा मेट्रोला देणार असून या कामाचा करार मंगळवार 23 रोजी होणार आहे. या करारानुसार डिसेंबरला मेट्रो रेल्वे पेंधर ते सेंट्रल पार्कदरम्यान धावणार असून डिसेंबर 2022 अखेर पर्यंत बेलापूर ते पेंधर मेट्रो रुळावर धावेल, अशा पद्धतीने सिडकोने नियोजन केल्याचे सिडको अधिकाऱ्यांनी सांगितले.

बेलापूर ते पेंधर या 11 किलोमीटर मार्गातील स्थापत्य कामे नव्वद टक्के पूर्ण

बेलापूर पेंधर मेट्रो सुरू होण्याच्या चार वेळा तारखा जाहीर करूनही आतापर्यंत न धावणारी सिडकोची नवी मुंबई मेट्रो येत्या डिसेंबरमध्ये धावणार आहे. सहा वर्षे रखडलेले या सेवेचे काम संथगतीने सुरू असल्याने सिडकोने सर्व कंत्राटदारांना हटवून त्या जागी महा मेट्रोला हे काम दिले आहे. या कामाचा लेखी करार होणार आहे. बेलापूर ते पेंधर या 11 किलोमीटर मार्गातील स्थापत्य कामे ही नव्वद टक्के पूर्ण झाली आहेत. मात्र विद्युत, माहिती तंत्रज्ञान आणि तांत्रिक कामे अद्याप शिल्लक आहेत. मेट्रो रेलमध्ये सर्वात महत्त्वाची डक्ट लाईन टाकण्याचे काम असून, सिडकोने शीव-पनवेल मार्गावरील उड्डाणपूल देखील या डक्टने जोडला आहे. त्यामुळे तांत्रिक आणि विद्युत कामांचे आव्हान आता शिल्लक आहे.

डिसेंबर महिन्यात पहिल्या टप्प्यात पेंधर ते सेंट्रल पार्क दरम्यान मेट्रो सुरू करणार

सिडकोने हे काम आता ‘महामेट्रो’ला देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘महामेट्रो’ने नागपूर व पुण्यातील मेट्रो मार्गाना चांगली गती दिली आहे. येत्या डिसेंबर महिन्यात पहिल्या टप्प्यात पेंधर ते सेंट्रल पार्क दरम्यान सुरू करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात डिसेंबर 2022 पर्यंत बेलापूर पेंधर मेट्रो मार्ग सुरू करण्यात येणार असल्याचे सिडको अधिकाऱ्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

नागपूर महापालिकेकडून ‘आपली बस’चे हस्तांतरण, नागरिकांना चांगली सुविधा मिळणार?

केंद्राकडून पुण्याच्या ‘मेट्रो 2’ प्रकल्पाला निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करु : देवेंद्र फडणवीस

Navi Mumbai Metro will run till the end of December 2022