नवी मुंबई, पनवेलमध्ये अत्यावश्यक सेवावगळता सर्व दुकाने बंद, व्यापारी वर्ग उतरला रस्त्यावर

खारघर वसाहतीत संतप्त दुकानदारांनी पोलिसांची गाडी अडवली. तर कळंबोलीत प्रभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून निर्बंधाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली.

  • हर्षल भदाणे पाटील, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई, पनवेल
  • Published On - 16:00 PM, 6 Apr 2021
नवी मुंबई, पनवेलमध्ये अत्यावश्यक सेवावगळता सर्व दुकाने बंद, व्यापारी वर्ग उतरला रस्त्यावर
Lockdown

नवी मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने महिनाभर कडक निर्बंध लावलेत. त्यामुळे पनवेल, नवी मुंबई परिसरातील दुकाने आज (6 एप्रिल) बंद करण्यात आलीत. याविरोधात व्यापारी, दुकानदारांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. खारघर वसाहतीत संतप्त दुकानदारांनी पोलिसांची गाडी अडवली. तर कळंबोलीत प्रभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून निर्बंधाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली. (Navi Mumbai, Panvel, all shops were closed except for essential services, traders took to the streets)

आम्ही जगायचे कसे, व्यापाऱ्यांचा सवाल

आम्ही जगायचे कसे, असा प्रश्नही व्यापाऱ्यांनी उपस्थित केला. आम्ही तुमचा आदर करतो, आम्ही नियमही पाळू पण आमच्या पोटावर लाथ मारू नका. खारघरमध्ये पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रू माळी यांनी व्यापाऱ्यांना विनंती केली, त्यानंतर गर्दी कमी झाली.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारची कडक पावले

कोरोना विषाणूंचे संक्रमण वाढत चालले आहे. विशेषतः महानगरात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक पावले उचललीत. त्यानुसार काही निर्बंध लावण्यात आले असून, मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. शनिवार आणि रविवारी पूर्ण टाळेबंदी करण्यात आली. इतर दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता बाकी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेत. याबाबत मार्गदर्शक तत्त्वे राज्य सरकारने जाहीर केलीत.

पनवेल परिसरात आजपासून कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात

आदेशाची पनवेल परिसरात आजपासून कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात झालीय. त्यानुसार खारघर परिसरातील दुकाने पोलिसांनी बंद केली. ठिकठिकाणी जाऊन दुकानदार, व्यावसायिकांना त्यांनी आवाहन केले. अन्यथा कारवाईचा इशारा दिला. एक महिना दुकाने आणि व्यवसाय बंद राहणार असल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीला दुकानदार, व्यापारी, व्यावसायिकांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित बातम्या

शरद पवारांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी 11 रुद्राक्ष महापूजन, राष्ट्रवादी सेवादलाचे शिवशंकराला साकडे

मुंबईच्या APMC मध्ये नियोजन शून्य कारभार, सभापतींच्या आदेशाला केराची टोपली, कोरोनाचा धोकाही वाढला

Navi Mumbai, Panvel, all shops were closed except for essential services, traders took to the streets