मी कुणाला घाबरत नाही; गणेश नाईकांचा थेट महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल

गणेश नाईकांनीही विरोधकांना चांगलंच शिंगावर घेतलंय.

  • हर्षल भदाणे पाटील, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई
  • Published On - 18:35 PM, 17 Jan 2021
मी कुणाला घाबरत नाही; गणेश नाईकांचा थेट महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल

नवी मुंबईः ”मी कुणाला घाबरत नाही आणि कुणाचे नाव घेऊन टीकासुद्धा करत नाही,” असं म्हणत भाजप नेते गणेश नाईक यांनी त्यांच्या राजकीय विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय. गणेश नाईक यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला होता. तिथे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गणेश नाईकांवर टीकास्त्र सोडलं होतं, त्याचाच आता गणेश नाईकांनी खरपूस समाचार घेतलाय. 25 वर्ष गणेश नाईक यांनी काहीही केले नाही जे केलं ते स्वार्थासाठी, असं विरोधक म्हणाले होते, त्यानंतर गणेश नाईकांनीही विरोधकांना चांगलंच शिंगावर घेतलंय. (I Am Not Afraid Of Anyone; Ganesh Naik Direct Attack On The Leaders Of Mahavikas Aghadi)

25 वर्ष गणेश नाईकला लोकांनी मान्य केलेय

मी कुणाला घाबरत नाही आणि कुणाचे नाव घेऊन टीका ही करत नाही. 25 वर्ष गणेश नाईकला लोकांनी मान्य केलेय. मी आजवर कुठलाही भ्रष्टाचार केला नाही. भ्रष्टाचार केला, असा आरोप ते करीत असतील तर आरोप सिद्ध करा, असं आव्हानच त्यांनी विरोधकांना दिलेय.

नवी मुंबईत महापौर भाजपचाच बसेल : गणेश नाईक

मी भाजपमध्ये आहे आणि राहीन. मी भाजप सोडणार नाही. महापौर भाजपचाच बसेल, असा विश्वासही गणेश नाईक यांनी व्यक्त केलाय. ज्यांना जी टीका करायची ती करू द्या. मी जनसेवेचा वसा कायम ठेवेन, असंही गणेश नाईक विरोधकांना उद्देशून म्हणालेत.

आता महाविकास आघाडी सक्षमपणे मैदानात उतरली आहे: विजय नाहटा

आम्ही एक वर्षापूर्वीच नवी मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी केली होती. पण कोरोनामुळे ती वाया गेली. पण आता महाविकास आघाडी सक्षमपणे मैदानात उतरली आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटप कसं होईल? बंडखोरी होईल, असं विरोधकांना वाटत आहे. पण तसं काही होणार नाही, असं विजय नाहटा यांनी सांगितलं. आमच्यात कोणतेही वाद नाहीत. ही महाविकास आघाडीची मोठी ताकद असल्याचं नाहटा यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

Breaking | केंद्राच्या कृषी कायद्यांविरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार

कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच; मुख्यमंत्र्यांनी ठणकावले

I Am Not Afraid Of Anyone; Ganesh Naik Direct Attack On The Leaders Of Mahavikas Aghadi