सिक्कीमचे मुख्यंमंत्री प्रेमसिंग तमांग थेट नवी मुंबईत, ‘हे’ आहे कारण?

सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी गुरुवारी (5 ऑगस्ट) रोजी सिडको भवनला भेट दिली. त्यामुळे या भेटीची चांगलीच चर्चा आहे.

सिक्कीमचे मुख्यंमंत्री प्रेमसिंग तमांग थेट नवी मुंबईत, 'हे' आहे कारण?


नवी मुंबई : सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी गुरुवारी (5 ऑगस्ट) रोजी सिडको भवनला भेट दिली. त्यामुळे या भेटीची चांगलीच चर्चा आहे. तमांग यांनी सिडको महामंडळाकडून सिक्कीम भवनाच्या उभारणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या नवी मुंबईतील जमिनीची पाहणी केली. सिक्कीम भवनासाठी खारघर येथे 4000 चौ.मी.चा भूखंड देण्यात आलाय. या भेटीवेळी त्यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्याकडे सदर भूखंड सिक्कीम सरकारला प्रदान केल्याबद्दल सिडको तसेच महाराष्ट्र शासनाप्रति आभार व्यक्त केले. सिडकोकडून नवी मुंबईच्या खारघर नोडमधील भूखंड क्र. 19 आणि 20 सिक्कीम भवनच्या उभारणीकरिता प्रदान करण्यात आले आहेत.

आपल्या भेटी दरम्यान प्रेमसिंग तमांग यांनी नवी मुंबईतील संधानता (कनेक्टिव्हिटी), सार्वजनिक परिवहन, पर्यावरण, आरोग्य आणि सामाजिक सुविधा क्षेत्रांत होत असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासाबद्दल प्रशंसोद्गार काढले. महाराष्ट्र आणि सिक्कीममधील सहकार्याचे हे पर्व वृद्धिंगत व्हावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

“कर्करोगाच्या उपचारांसाठी मुंबई आणि नवी मुंबईत येणाऱ्या सिक्कीम नागरिकांना निवारा”

मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग म्हणाले, “सिक्कीम भवनच्या उभारणीसाठी देण्यात आलेल्या या भूखंडामुळे लवकरात लवकर सिक्कीम भवनाचे काम मार्गी लागेल. सिक्कीम भवनाच्या उभारणीमुळे कर्करोगाच्या उपचारांसाठी मुंबई आणि नवी मुंबईमध्ये येणाऱ्या सिक्कीममधील गरजू नागरिकांच्या निवाऱ्याची सोय होणार आहे. कधीकाळी दुर्लक्षित असलेल्या प्रदेशाचे रूपांतर नवी मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरामध्ये करून शहरातील जमिनीचे मूल्य वाढवण्यासाठी सिडकोने केलेल्या प्रयत्नांचंही मी मनापासून कौतुक करतो.”

“महाराष्ट्र आणि सिक्कीम अनोखा सांस्कृतिक व जिव्हाळ्याचा बंध प्रस्थापित होणार”

“सामाजिक उद्देशांकरिता भूखंड देण्यास सिडकोने आपल्या स्थापनेपासूनच प्राधान्य दिले आहे. सिक्कीम भवनाच्या उभारणीनंतर, येथे येणाऱ्या सिक्कीमच्या नागरिकांची निवासाची व्यवस्था होईल. त्याबरोबरच महाराष्ट्र आणि सिक्कीम यांमध्ये एक अनोखा सांस्कृतिक व जिव्हाळ्याचा बंध प्रस्थापित होणार आहे,” असं मत यावेळी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी व्यक्त केलं.

या प्रसंगी डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडकोतील यांसह कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक, के. गोडबोले, मुख्य अभियंता (नवी मुंबई), प्रशांत भांगरे, पणन व्यवस्थापक (वाणिज्यिक), सिडकोतील अन्य विभाग प्रमुख आणि सिक्कीम सरकारचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

Earthquake : देशातील अनेक राज्यांत भूकंपाचे जोरदार धक्के, 5.4 रिस्टर स्केलची तीव्रता, पंतप्रधान मोदींकडून आढावा

हिमालयातील सुंदर घाटीची सैर करा अवघ्या 11 हजार रुपयांत!

व्हिडीओ पाहा :

Sikkim CM Premsingh Tamang visit Navi Mumbai Know why

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI