आमच्या बहिणीने तर लहान मुलांच्या चिक्कीचे पैसे खाल्लेत : धनंजय मुंडे

पालघर : राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा आज पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथे पोहोचली आहे. कोकणात आपल्या आक्रमक शैलीत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणारे राष्ट्रवादीचे नेते आणि विधापरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विक्रमगडमधील सभेतही तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी फडणवीस सरकारच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचताना, त्यांची बहीण आणि राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरही हल्लाबोल केला. आमच्या बहिणीने …

आमच्या बहिणीने तर लहान मुलांच्या चिक्कीचे पैसे खाल्लेत : धनंजय मुंडे

पालघर : राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा आज पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथे पोहोचली आहे. कोकणात आपल्या आक्रमक शैलीत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणारे राष्ट्रवादीचे नेते आणि विधापरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विक्रमगडमधील सभेतही तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी फडणवीस सरकारच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचताना, त्यांची बहीण आणि राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरही हल्लाबोल केला. आमच्या बहिणीने तर लहान मुलांच्या चिक्कीचे पैसे खाल्ले, असे म्हणत धनंयज मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष चित्र वाघ, माजी मंत्री गणेश नाईक हेही व्यासपीठार उपस्थित होते.

धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

“फडणवीस सराकरमधील 16 मंत्र्यांनी 90 हजार कोटी लुटून नेले. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला ‘भ्रष्टाचारयुक्त’ केलं. 16 मंत्र्यांच्या 90 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे पुरावे दिले. आमच्या बहिणीने तर लहान मुलांच्या चिक्कीचे पैसे खाल्ले.”, असा हल्लाबोल धनंजय मुंडे यांनी केला.

मुंडे विरुद्ध मुंडे वाद पेटणार?

आपल्या सगळ्यांना माहितच आहे की, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे भाऊ-बहीण आहेत. गोपीनाथ मुंडे यांचे बंधू पंडीतअण्णा मुंडे यांचे धनंजय मुंडे हे सुपुत्र. दिवंगत गोपीनाथ मुंडे हयात असतानाच धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तेव्हापासून मुंडे घरात दोन गट निर्माण झाले. आता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे मुंडे कुटुंबातील पुढच्या पिढीचे दोन्ही वारसदार एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू आहेत. बीडमधील राजकारणही या दोन्ही भावंडांच्या गोल फिरताना दिसते. एकमेकांवर शरसंधान साधण्यास ही दोन्ही भावंडं मागे-पुढे पाहत नाहीत. त्यात आता धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्यावरुन टीका केल्याने बीडसह राज्याच्या राजकारणात पुन्हा ‘मुंडे विरुद्ध मुंडे’ असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

कथित चिक्की घोटाळा नेमका काय आहे?

अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी मुलांना वाटली जाणारी चिक्की निकृष्ट दर्जाची असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यात अत्यंत खळबळजनक माहिती उजेडात आली होती. महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्याने एका दिवसात चिक्की, चटई, डिश, पुस्तकं इत्यादी वस्तूंची तब्बल 206 कोटींची खरेदी केल्याचे समोर आले होते. या खरेदीसाठी एका दिवसात 24 आदेश काढल्याचाही आरोप झाला होता. या खरेदीत नियमभंग केल्याचाही आरोप झाला होता. याचं कारण 3 लाख रुपयांच्यावरची खरेदी ई-टेंडरद्वारे करण्याचा नियम आहे.

दुसरीकडे, पंकजा मुंडे यांनी या सर्व आरोपांना उत्तर दिले होते. शिवाय, हे आरोप खोटे आणि राजकीय असल्याचेही त्यांनी स्पष्टीकरण दिले होते. कोणताही नियम धाब्यावर बसवलेला नाही, असेही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले होते. मुख्यमंत्र्यांनीही पंकजा मुंडे यांना क्लीन चिट दिली होती.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा पंकजा मुंडेवर कथित चिक्की घोटाळ्यावरुन हल्लाबोल केल्याने, आता पंकजा मुंडे काय उत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *