पंकजांच्या जवळचे राष्ट्रवादीचे आमदार शिवसेनेत प्रवेश करणार?

पंकजांच्या जवळचे राष्ट्रवादीचे आमदार शिवसेनेत प्रवेश करणार?

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या औरंगबादेत होणाऱ्या सभेत जयदत्त क्षीरसागर हे शिवबंधन बांधण्याची शक्यता आहे. जयदत्त क्षीरसागर हे सातत्याने राष्ट्रवादीविरोधी भूमिका घेत आहेत. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना दूर ठेवत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते पंकजा मुंडेंसोबत भाजपच्या मंचावर दिसतात. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असं वाटत होतं, मात्र आता ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे बीड जिल्ह्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळणार आहे.

उद्धव ठाकरेंची भेट

दरम्यान, जयदत्त क्षीरसागर यांनी काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांची मुंबईत मातोश्रीवर येऊन भेट घेतली होती. गुढीपाडव्याच्या निमित्ताने जयदत्त क्षीरसागर यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली होती. उद्धव ठाकरे यांच्यासह यावेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांचीही उपस्थिती होती. जयदत्त क्षीरसागर यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.

जयदत्त क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट

जयदत्त क्षीरसागर यांनी काही दिवसापूर्वी फेसबुक पोस्ट लिहिली होती. या सरकारच्या काळात बीड जिल्ह्यासाठी भरघोस निधी आलाय. आमची साथ कायम विकासाला होती. त्यामुळे या निवडणुकीत भाजपच्या बीडच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांना मदत करुन विजयाची गुढी उभारु, असं या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं. वाचा संपूर्ण पोस्ट  – जयदत्त क्षीरसागरांची फेसबुक पोस्ट

जयदत्त क्षीरसागर प्रितम मुंडेंच्या प्रचारात

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपच्या बीडच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांच्यासाठी प्रचारही सुरु केला आहे. या निवडणुकीत त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. शिरुर तालुक्यातील खालापुरीमध्ये झालेल्या सभेला जयदत्त क्षीरसागरांनी हजेरी लावत प्रितम मुंडेंना मतदान करण्याचं आवाहन केलं. याशिवाय बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला.

कोण आहेत जयदत्त क्षीरसागर?

जयदत्त क्षीरसागर हेबीडमधून तीन वेळा खासदार राहिलेल्या केसरबाई क्षीरसागर यांचे चिरंजीव आहेत. जयदत्त क्षीरसागर हे काँग्रेसमध्ये होते. नंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत ते राष्ट्रवादीत आले. राष्ट्रवादीत एक ओबीसी चेहरा आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तोडीस तोड म्हणून राष्ट्रवादीने त्यांना मंत्रिमंडळात अनेकदा संधी दिली. देशासह राज्यात भाजपची लाट असताना बीड जिल्ह्यातून ते राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक विजयी झाले होते. जिल्ह्यात दमदार यंत्रणा असणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे सर्वात जास्त शिक्षण संस्था आहेत. बीड, धारूर, माजलगाव आणि शिरूर तालुक्यात जयदत्त क्षीरसागर यांचा मोठा प्रभाव आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती, बीड नगरपालिका, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्था क्षीरसागर यांच्या ताब्यात आहेत.

क्षीरसागर कुटुंबात वाद

काका-पुतणे यांचा वाद हा महाराष्ट्राला काही नवीन नाही. ठाकरे घरात पहिली ठिणगी पेटल्यानंतर हा प्रकार दिग्गज नेत्यांच्या घरी सुरु राहिला. यात दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि पुतणे धनंजय मुंडे यांचं घर फुटलं. त्यानंतर जिल्ह्यात मोठा दुसरा धक्का तो म्हणजे क्षीरसागर घराण्याला बसला. पुतणे संदीप क्षीरसागर यांना जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यावरून घरात वाद पेटला तो अद्याप शमलाच नाही. नाराज पुतणे संदीप क्षीरसागर यांची नाराजी वाढतच गेली आणि काकू नाना आघाडी स्थापन करून खऱ्या अर्थाने संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांच्याविरुद्ध बंड पुकारलं. पुतण्याला जिल्ह्यातील पक्षातील काही नेत्यांकडूनच जाणिवपूर्वक बळ दिलं जात असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर नाराज आहेत.

संबंधित बातम्या  

राष्ट्रवादीचे नाराज नेते जयदत्त क्षीरसागर उद्धव ठाकरेंच्या भेटीला ‘मातोश्री’वर 

जयदत्त क्षीरसागर भाजपच्या व्यासपीठावर, प्रितम मुंडेंसाठी जाहीर प्रचार   

जयदत्त क्षीरसागरांची फेसबुक पोस्ट  

पंकजांच्या बेरजेच्या राजकारणाला आणखी एक यश, धनंजय मुंडेंना धक्का    

बीडमधील राष्ट्रवादीचा चेहराच भाजपच्या वाटेवर, जयदत्त क्षीरसागर मोठ्या निर्णयाच्या तयारीत  

स्पेशल रिपोर्ट : जयदत्त क्षीरसागर यांचा प्रीतम मुंडेंना पाठिंबा  

जयदत्त क्षीरसागर यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *