अंधश्रद्धेची दाहकता, मध्यरात्री दर्गा धुवून कासवाला मुरमुरे भरवण्याचा हट्ट, नवविवाहितेचा क्रूर छळ

धक्कादायक, क्रूर आणि अघोरी अशी घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली. गुप्तधनासाठी सलग 50 दिवस नवविवाहितेचा क्रूरपणे छळ केल्याचं उघड झालं आहे.

अंधश्रद्धेची दाहकता, मध्यरात्री दर्गा धुवून कासवाला मुरमुरे भरवण्याचा हट्ट, नवविवाहितेचा क्रूर छळ

चंद्रपूर : धक्कादायक, क्रूर आणि अघोरी अशी घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली. गुप्तधनासाठी सलग 50 दिवस नवविवाहितेचा क्रूरपणे छळ केल्याचं उघड झालं आहे. चिमूर तालुक्यातल्या सावरी-बीडकर गावात हा संतापजनक प्रकार घडला. अंधश्रद्धेने विकृत झालेल्या सुशिक्षित-मातब्बर कुटुंबाने, गुप्तधनासाठी नवविवाहितेला दररोज रात्री अडीच वाजता घरातील दर्गा धुऊन-जिवंत कासवाला मुरमुरे भरवण्यास बजावलं. सतत 50 दिवस उपासमार, मारझोड आणि अघोरी प्रकारामुळे खचलेल्या नवविवाहितेची अंनिसने कशीबशी सुटका केली.

काय आहे नेमका प्रकार?

सावरी-बीडकर गावातील समीर गुणवंत यांचा विवाह ऑगस्ट 2018 मध्ये, गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरीच्या वाघाडे कुटुंबातील सविता यांच्याशी झाला. लग्नाच्या पहिल्याच रात्री नवविवाहिता सविता हिला रात्री अडीच वाजता उठून, घराच्या अंगणात असलेल्या पुरातन दर्ग्याची स्वच्छता आणि दर्गा धुण्यास सांगण्यात आले.  याच दर्ग्यात असलेल्या जिवंत कासवाला आंघोळ घालून, पूजा अर्चना करत सुमारे दोन तास मुरमुरे खाऊ घालण्यास सांगण्यात आले.

याच दरम्यान समीरच्या अंगात ताजुद्दीन बाबा आला आणि त्याने हळद सुटण्याच्या आधीच सविताला बेदम मारहाण-चटके देण्यास सुरुवात केली. यात सासू-सासरेही सहभागी होते, असा आरोप आहे.

कारेकर यांच्या घराला उंच संरक्षक भिंत असल्याने आत सुरु असलेल्या प्रकाराबाबत शेजारी अनभिज्ञ राहिले. याशिवाय सूर्योदय ते सूर्यास्त या काळात नवविवाहितेला उपाशी ठेवून हे कृत्य करायचे असल्याने, पहिल्या दिवसापासूनच सविताची उपासमार केल्याचा आरोप आहे. पुरातन दर्ग्याच्या खाली असलेले गुप्तधन या सर्व विधींमुळे आपोआप वर येईल, अशी या आरोपी कुटुंबाची धारणा होती.

छळाचा हा प्रकार सतत सुरु राहिला. या दरम्यान सविताकडील मोबाईलही काढून घेण्यात आल्याने तिचा माहेरशी संवाद होत नव्हता.

तिसरे लग्न असल्याचा धक्कादायक प्रकार

सविताला या दरम्यान एक धक्कादायक घटना समजली. नवरा समीरचं हे तिसरं लग्न असल्याचं तिला समजलं. या छळाची माहिती सविताच्या वडिलांपर्यंत पोहोचल्यावर त्यांनी कारेकर यांचे घर गाठत  मुलीला माहेरी नेले. या छळविषयी सविताच्या वडिलांनी पोलीस-वनविभागाला माहिती दिली. मात्र यावर कुठलीही कारवाई झाली नाही.

दरम्यान समीर चौथा विवाह करणार असल्याची माहिती मिळाल्याने वाघाडे कुटुंब धडा शिकविण्यासाठी पुढे सरसावले. अखेर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना याविषयी माहिती दिल्यावर, त्यांनी पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधल्यानंतर, याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.

आरोपी कारेकर कुटुंबीय आणि पीडित वाघाडे कुटुंबं हे मातब्बर आणि सुशिक्षित समजली जातात. मात्र अंधश्रद्धेचा पगडा समाजात किती खोलवर आणि घातक रुजला आहे हे या प्रकाराने समोर आलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *