SPECIAL REPORT | मेळघाट व्याघ्र प्रकल्पात मानव आणि वाघांमध्ये संघर्ष नाही, तर आपुलकीचं नातं!

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात मानव आणि वाघांमध्ये कुठलाही संघर्ष पाहायला मिळत नाही. एकीकडे चंद्रपुरात वाघांच्या हल्ल्याचा मालिका सुरु असताना मेळघाटातील वाघ मुक्त संचार करताना पाहायला मिळतात. त्याचाच परिणाम म्हणून आज मेळघाटातील वाघांची संख्या 70 वर जाऊन पोहोचली आहे.

  • सुरेंद्रकुमार आकोडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल, अमरावती
  • Published On - 13:21 PM, 2 Nov 2020

अमरावती: महाराष्ट्रातील जैवविविधतेचं भांडार, राज्यातील एकमेव व्याघ्र प्रकल्प, अशी ओळख असलेल्या मेळघाटात मानव आणि वाघांमध्ये कुठलाही संघर्ष पाहायला मिळत नाही. एकीकडे चंद्रपुरात वाघांच्या हल्ल्याची मालिका सुरु असताना मेळघाटातील वाघ मात्र मुक्त संचार करताना पाहायला मिळतात. चंद्रपूरच्या तुलनेत मेळघाटात वाघ आणि माणसांमधील संघर्ष कमी आहे. त्याचं कारण  मेळघाट व्याघ्र प्रकल्प, 4 वन्यजीव अभयारण्य आणि एक प्रादेशिक विभाग मिळून इथं तब्बल 291 खेडेगावं आहेत. 1998 पासून आतापर्यंत इथल्या १९ गावांचं पुनर्वसन करण्यात आलं आणि त्याचाच परिणाम म्हणून आज मेळघाटातील वाघांची संख्या 70 वर जाऊन पोहोचली आहे. (There is no conflict between tiger and man in Melghat tiger project)

कोरकू समाजात वाघाला श्रद्धेचं स्थान

मेळघाटात तापी, सिपना, खंडू, डोलार आणि गाडगा या नद्यांमध्ये पाणी उपलब्ध असल्यानं वाघांचा मनुष्यवस्तीकडील संचार कमी आहे. त्याचबरोबर गावांचं योग्य पुनर्वसन, वन्यजीव व्यवस्थापन, आणि मेळघाटातील भौगोलिक संरचनेचा फायदा मानव आणि वाघांमधील संघर्ष रोखण्यासाठी होत आहे. स्थानिक आदिवासी वाघाला ‘कुला मामा’ अर्थात आईचा भाऊ मानतात. तर इथला ‘कोरकू’ आदिवासी समाज वाघाला श्रद्धास्थानी मानतो. त्यामुळे आदिवासी समाजाकडून वाघांची शिकार केली जात नाही.

गावांचं पुनर्वसन आणि योग्य नियोजन

विस्तीर्ण प्रदेश, मोकळा अधिवास, खाद्य आणि पाण्याची मुबलक सोय असल्यानं इथले वाघ मनुष्यवस्तीकडे फिरकत नाहीत. वाघांसाठी पाणवठे निर्माण करणे, पाणवठ्यात वीष प्रयोग होऊ नये याची काळजी घेणे, जागोजागी कॅमेरे लावणे, अशी खबरदारीही घेण्यात येते. सोबतच मेळघाटातील वाघांची शिकार रोखण्यासाठी शिकार प्रतिबंधक दलाची कामगिरीही महत्वपूर्ण मानली जाते. वाघांना मुक्त संचार करता यावा म्हणून प्रशासनाकडून नजिकच्या गावांचं पुनर्वसन करण्यात आलं. पुनर्वसित गावांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या. त्यामुळे इथल्या नागरिकांच्या समस्याही सुटल्या आहेत.

मेळघाटातील तब्बल ४ हजार चौरस किलोमीटर अशा विस्तीर्ण जंगलात आजही माणूस पोहोचलेला नाही. त्यामुळे इथल्या वाघांचा वावर मुक्तपणे सुरु असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. इथल्या कोरकू या आदिवासी समाजाची श्रद्धाही वाघांसाठी जीवनदायी ठरतेय. त्यामुळेच मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वत रांगांमध्ये वसलेल्या या मेळघाटात मानव आणि वाघांमध्ये संघर्ष नावालाही दिसत नाही.

मेळघाटातील प्रसिद्ध दिवाळी

मेळघाटातील दिवाळीचा सण राज्यभरात प्रसिद्ध आहे. लक्ष्मीपूजनापासून सुरु होणारी दिवाळी पुढील १० दिवस चालते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गाई व म्हशींना जंगलातील नदीवर नेऊन आंघोळ घातली जाते. त्यानंतर नदीवरच कुलदैवताची पूजा केली जाते. घरी परतल्यानंतर सायंकाळी गोठ्यात शिरण्याआधी गाईंच्या पायावर पाणी घातले जाते. यथासांग पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदेला दुभत्या जनावरांची विशेष पूजा केली जाते. त्यांना गोडधोड खाऊ घातले जाते. गवळी समाजाच्या दिवाळीत हा दिवस सर्वांत महत्त्वाचा मानला जातो.

संबंधित बातम्या:

तंत्र-मंत्रासाठी वाघाच्या अवयवाची मागणी, मेळघाटात शिकारी टोळ्या अटकेत

विदर्भातील काश्मिरात धुक्याची चादर, चिखलदरा पर्यटकांनी फुलले

Melghat Waterfall | मनमोहक धबधब्यांनी बहरला मेळघाट

There is no conflict between tiger and man in Melghat tiger project