पाचगणीत घोडेस्वारी बंद, पर्यटकांचा हिरमोड, घोडे व्यावसायिकही अडचणीत

संतोष नलावडे, टीव्ही 9 मराठी, सातारा : महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या पाचगणीत आता पर्यटकांना घोडेस्वारीचा आनंद घेता येणार नाही. कारण पाचगणीच्या टेबललँडवर पोलिसांनी बंदी आणली आहे. पाचगणीच्या टेबललँडवरील घोड्यांच्या टापांचा आवाज शांत झाल्याने, परिसरात आता सन्नाटा पहायला मिळतो आहे. काही दिवसांपूर्वी याच टेबललँडवर घोड्यावरुन पडून एका पर्यटकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळेच घोड्यांच्या रपेटीवर बंदी आणली …

पाचगणीत घोडेस्वारी बंद, पर्यटकांचा हिरमोड, घोडे व्यावसायिकही अडचणीत

संतोष नलावडे, टीव्ही 9 मराठी, सातारा : महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या पाचगणीत आता पर्यटकांना घोडेस्वारीचा आनंद घेता येणार नाही. कारण पाचगणीच्या टेबललँडवर पोलिसांनी बंदी आणली आहे. पाचगणीच्या टेबललँडवरील घोड्यांच्या टापांचा आवाज शांत झाल्याने, परिसरात आता सन्नाटा पहायला मिळतो आहे.

काही दिवसांपूर्वी याच टेबललँडवर घोड्यावरुन पडून एका पर्यटकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळेच घोड्यांच्या रपेटीवर बंदी आणली गेली. यामुळे पिढीजात घोड्यांच्या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या अनेकांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता घोडेमालकांनी करुन प्रत्येक घोडे व्यावसायिकाला परवाना देण्याची प्रक्रिया सुरु असल्याची प्रतिक्रिया पाचगणीच्या नगराध्यक्ष लक्ष्मी कराडकर यांनी दिली आहे.

पर्यटकांच्या सुरक्षितेचा प्रश्न डोळ्यांसमोर ठेवून घोडेस्वारी बंदीचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. घोड्यांच्या रपेटीवर आलेल्या या बंदीमुळे स्थानिक घोडे व्यावसायिकांची दिवाळी मात्र अंधःकारमय झाल्याने सर्व व्यावसायिक हतबल झाले आहेत. घोडे व्यावसायिकांवर प्रशासनाने नियमावली ठरवून देऊन आमचा व्यवसाय पूर्ववत सुरु करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी घोडे व्यावसायिक करत आहेत.

काहीशी बंदी महाबळेश्वरमध्येही लागू करण्यात आली होती. मात्र महाबळेश्वरच्या घोडे व्यावसायिकांच्या बैठकीनंतर ही बंदी हटवण्यात आली. यापुढील काळात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेऊन नियमावली बनवून त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. मात्र प्रशासनाने घातलेल्या या बंदीमुळे पिढीजात सुरु असलेला हा व्यवसाय बंद पडलाय आणि तो करणाऱ्या घोडे व्यावसायिकांवर अन्याय होतोय आणि तो दूर करणंही तितकंच महत्वाचं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *