धक्कादायक! उस्मानाबादेत 48 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं खळबळ

48 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानं पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. (Osmanabad teachers Corona Positive)

  • संतोष जाधव, टीव्ही 9 मराठी, उस्मानाबाद
  • Published On - 20:12 PM, 20 Nov 2020

उस्मानाबाद : जिल्ह्यातील 48 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. श्रीपतराव भोसले हायस्कूलमधील 20 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. 23 नोव्हेंबरपासून 9 वी ते 12 शाळा सुरू होत आहेत. त्याचदरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानं पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. (Osmanabad 48 Teachers Found Corona Positive)

491 शाळेतील 4 हजार 593 शिक्षकांपैकी 3 हजार 702 शिक्षकांची कोरोना चाचणी पूर्ण झाली आहे. शाळेची घंटा वाजण्यापूर्वी कोरोनाची धोक्याची घंटा वाजल्यानं अनेकांच्या मनात भीतीनं घर केलं आहे. राज्यातील 9 वी ते 12 पर्यंतच्या शाळा आणि महाविद्यालय 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यापूर्वी शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांचे आणि संबंधित स्टाफ, कर्मचारी यांची कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. मात्र अनेक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडत असल्याचं भीतीचं वातावरण पसरलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात 48 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आले असून, त्यात उस्मानाबाद शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या 20 शिक्षकांचा समावेश आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात 9 वी ते 12 पर्यंतच्या 491 शाळा असून, त्यात 4 हजार 593 शिक्षक आहेत. त्यापैकी 3 हजार 786 शिक्षकांनी कोरोना चाचणी केली आहे, त्यातील 48 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर 3 हजार 702 शिक्षक कोरोना निगेटिव्ह आल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सुसर यांनी दिली आहे. 807 शिक्षकांचे कोरोना अहवाल येणे अद्याप बाकी आहे.(Osmanabad 48 Teachers Found Corona Positive)

48 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मोठी खळबळ

उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक शाळेतील शिक्षकांच्या कोरोना तपासणीसाठी तपासणी केंद्रात रांगा लागल्या असून, 48 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. उस्मानाबाद शहरातील भोसले हायस्कूलमधील जवळपास 20 च्यावर शिक्षक व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे पॉझिटिव्ह सापडलेल्या अनेक शिक्षकात कोरोनाची कोणतीही थंडी, ताप, सर्दी आणि खोकला अशी लक्षणे नव्हती. अनेक शिक्षक हे असिम्टोमॅटिक होते.

कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नसून दिवाळी व इतर सणात नागरिकांची बाजारपेठेतील गर्दी आणि कोरोना नियमाचे उल्लंघन कोरोनाला आमंत्रण देणारे ठरत आहे. राज्य सरकारने शाळा सुरू करताना कोरोना सुरक्षा नियमांची यादी तयार केली असली तरी सर्व नियम कागदावरच असल्याचे मंदिर, प्रार्थनास्थळे उघडल्यानंतर समोर आले होते. 9 वी ते 12 पर्यंतच्या शाळा सुरू करताना विद्यार्थिनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमती आवश्यक आहे. आजारी असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये. विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या संमतीने घरी राहून देखील अभ्यास करता येणार आहे. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णतः पालकांच्या लेखी संमतीवर अवलंबून आहे. पूर्ण उपस्थितीबाबतची पारितोषिक बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे शाळा सुरू झाल्यास पालक व विद्यार्थी यांचा कितपत प्रतिसाद मिळतो याकडे लक्ष लागले आहे.

(Osmanabad 48 Teachers Found Corona Positive)

संबंधित बातम्या :

Thane School | ठाणे जिल्ह्यातील शाळा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद राहणार; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबईतील सर्व शिक्षकांच्या अँटी पीसीआर चाचण्या, पालिका प्रशासनाचा निर्णय

Mumbai School | दिल्ली इफेक्ट, मुंबईतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, आयुक्तांचा निर्णय