उस्मानाबादमधील दुष्काळ लपवण्याचे प्रयत्न, चारा छावण्या घटवल्या, मुख्यमंत्र्यांचे आदेश दुर्लक्षित

पावसाअभावी उस्मानाबदसह मराठवाड्यातील अनेक जिल्हे कोरडेठाक आहेत. उस्मानाबदमधील भीषण दुष्काळ लपवण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाची यंत्रणा कामाला लागल्याचं समोर आले आहे.

उस्मानाबादमधील दुष्काळ लपवण्याचे प्रयत्न, चारा छावण्या घटवल्या, मुख्यमंत्र्यांचे आदेश दुर्लक्षित

उस्मानाबाद :  पावसाअभावी उस्मानाबदसह मराठवाड्यातील अनेक जिल्हे कोरडेठाक आहेत. उस्मानाबदमधील भीषण दुष्काळ लपवण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाची यंत्रणा कामाला लागल्याचं समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चारा छावणी मुदतवाढ आदेशाला उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाने केराची टोपली दाखवली आहे.

दुष्काळग्रस्त भागात 31 ऑगस्टपर्यंत चारा छावणी सुरू ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांच्या आदेशाने जिल्ह्यातील तहसीलदारांनी  चारा छावणी बंद करण्याचे लेखी आदेश चारा छावणी चालकांना दिले आहेत. यामुळे शेतकरी आणि चारा छावणी चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाचा कारभार उघड करणारे आदेश टीव्ही 9 मराठीच्या हाती लागले आहेत. जिल्ह्यातील चारा छावणीतील 60 हजार जनावरांच्या चारा प्रश्न गंभीर बनला असून, प्रशासनाच्या दबावामुळे 70 पैकी केवळ 15 चारा छावणी सुरू आहेत.

पाण्याच्या टँकरबाबतीतही हेच धोरण अवलंबले जात आहे. त्यामुळे पाऊस पडलेला नसताना, पाणीसाठा झालेला नसताना, अचानक टँकरची संख्या कमी होत आहे. ग्रामसेवकांकरवी सरपंचांकडून टँकरची गरज नसल्याचे लिहून घेत, अनेक गावांत पाणीटंचाई असूनही टँकर बंद केले जात आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात यंदा 81 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जिल्ह्यात जुलैअखेर 159 गावात 211 टँकर सुरू होते. 17 मध्यम प्रकल्पात 0 टक्के पाणीसाठा, तर 205 लघु प्रकल्पात 1 टक्के पाणी शिल्लक आहे. चारा आणि पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावे लागते. मात्र तरीही प्रशासन कागदोपत्री दुष्काळ लपविण्यासाठी कामाला लागले आहे.

प्रशासनाच्या या आडमुठे धोरणामुळे उस्मानाबादचे पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री तानाजीराव सावंत यांनी स्वातंत्र दिनाच्या कार्यक्रमात प्रशासनाला सरकारच्या आदेशाची आठवण करुन दिली. त्यानुसार 31 ऑगस्टपर्यंत चारा छावणी सुरू ठेवण्यास बजावलं. मात्र त्याचा फारसा फरक पडलेला नाही.

उस्मानाबाद जिल्ह्यात प्रशासनाकडून सुरू असलेल्या या कारभाराबाबत, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी गप्प आहेत. सर्व जण आगामी विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीत व्यस्त आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *