मोठी बातमी: सिंधुदुर्गातील शिवसेना-भाजप राड्यानंतर वैभव नाईकांवर गुन्हा दाखल

Shivsena BJP | आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेनेच्या वीस ते पंचवीस जणांवर तर भाजपच्या 10 ते 12 जणांवर कुडाळ पोलिसांनी शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर भादंवी कलम 188,143 अन्वये गुन्हे दाखल असल्याचे समजते.

मोठी बातमी: सिंधुदुर्गातील शिवसेना-भाजप राड्यानंतर वैभव नाईकांवर गुन्हा दाखल
शिवसेना-भाजप राडा

सिंधुदुर्ग: शिवसेनेच्या वर्धापनदिनी कुडाळमध्ये नारायण राणे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर झालेल्या राड्यानंतर आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्यासह शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बेकायदा जमाव करून तसेच कोरोना काळात लोकांच्या आरोग्यास व जीवितास धोका निर्माण करणे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका संबंधितांवर ठेवण्यात आला आहे. आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेनेच्या वीस ते पंचवीस जणांवर तर भाजपच्या 10 ते 12 जणांवर कुडाळ पोलिसांनी शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर भादंवी कलम 188,143 अन्वये गुन्हे दाखल असल्याचे समजते.

तत्पूर्वी वैभव नाईकांवर गुन्हा दाखल न केल्यास भाजप स्टाईल कारवाई करण्याचा इशारा भाजप नेते राजन तेली यांनी दिला होता. वैभव नाईक व त्यांच्या सत्ताधारी लोकांनी आत्मपरीक्षण करायला हवं. आपला जिल्हा रेड झोनमध्ये आहे, पॉझिटिव्हीटी रेट कमी दाखवून गोष्टी दडवल्या जात आहेत. या सगळ्या गोष्टींवर त्यांनी काहीतरी करायला हवं होतं. जिल्ह्यात 950 लोक कोरोनाने गेलेत, त्याला जबाबदार कोण? त्याची जबाबदारी वैभव नाईक व पालकमंत्री घेणार आहेत का? लोकांना सांगता आहेत कोरोना वाढतोय गर्दी करू नका मग यांना मुभा दिली आहे की लायसन दिलं आहे, असे अनेक सवाल राजन तेली यांनी उपस्थित केले होते.

नेमकं काय घडलं?

शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त वैभव नाईक यांनी भाजपला डिवचण्यासाठी येथील एका पेट्रोल पंपावर स्वस्तात पेट्रोल वाटप सुरु केले होते. मात्र, हा पेट्रोलपंप नेमका नारायण राणे यांच्या मालकीचा निघाला. वैभव नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते पेट्रोल पंपावर नागरिकांना पेट्रोल खरेदी करण्यासाठी पैसे वाटत होते. त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते त्याठिकाण आले आणि त्यांनी आक्षेप घेतला. तेव्हा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणबाजी सुरु केली आणि एकमेकांच्या अंगावर धावून गेले. विशेष म्हणजे आमदार वैभव नाईक यांनीही या हाणामारीत भाग घेण्याचा प्रयत्न केला. ते भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावूनही गेले होते. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. यानंतर वैभव नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते दुसऱ्या पेट्रोल पंपावर निघून गेले.

संबंधित बातम्या:

…तर ‘सामना’च्या ऑफिसमध्ये येऊन ‘प्रसाद’ देईन; नितेश राणेंचा संजय राऊतांना इशारा

शिवसेना भवनानंतर कोकणातही राडा, आमदार वैभव नाईक राणेंच्या पेट्रोल पंपावर, सेना-भाजप धुमश्चक्री

नारायण राणेंच्या पेट्रोल पंपावर शिवसेनेचा राडा; निलेश राणे संतापाच्या भरात म्हणाले…

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI