रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प मार्गी लागणार?; विनायक राऊतांच्या भेटीगाठी; प्रकल्पासाठी राजापुरात नवी जागा शोधली?

रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी रिफायनरी समर्थकांच्या भेटी घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आहे. (Ratnagiri refinery)

रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प मार्गी लागणार?; विनायक राऊतांच्या भेटीगाठी; प्रकल्पासाठी राजापुरात नवी जागा शोधली?
vinayak raut

रत्नागिरी: रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी रिफायनरी समर्थकांच्या भेटी घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आहे. तसेच या प्रकल्पासाठी राजापुरातीलच एक जागा शोधण्यात आली असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. या प्रकल्पाच्या विरोधात असलेल्या शिवसेनेने पहिल्यांदाच सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाचं भिजत घातलेलं घोंगडं मार्गी लागण्याची शक्यता बळावली आहे. (shivsena leader vinayak raut met Ratnagiri refinery supporter in ratnagiri)

शिवसेना खासदार विनायक राऊत हे रिफायनरी समर्थकांना भेटले. राजापूरच्या रेस्ट हाऊसवर ही भेट झाली. या भेटीचा व्हिडीओ टिव्ही ९च्या हाती लागला आहे. राजापूरच्या बारसू सोलगाव परिसरात रिफायनरी व्हावी, अशी आग्रही मागणी रिफायनरी समर्थकांनी राऊत यांच्याकडे केली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या उभारणीच्या हालचाली सुरू झाल्याचं सांगण्यात येतं. रिफायनरीसाठी कंपनीकडून बारसू सोलगावातील एमआयडीसीच्या जागेचा विचार सुरू असल्याचंही सांगितलं जात आहे.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

बारसू सोलगावात रिफायनरी व्हावी या मागणीचे निवेदन रिफायनरी समर्थकांनी राऊत यांना दिले. तर राऊत यांनीही हे निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यत पोहचवणार असल्याची ग्वाही रिफायनरी समर्थकांना दिली आहे. 28 किंवा 29 ऑगस्टला याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्यात येणार आहे. मात्र, रिफायनरीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असं राऊत यांनी म्हटलं आहे.

सुखथनकरांचा सल्ला

दरम्यान, राज्याचे माजी मुख्य सचिव द. म. सुखथनकर यांनीही रिफायनरीबाबत लवकर निर्णय घ्या, असा सल्ला राज्य सरकारला दिला होता. राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती येण्यासाठी नेमलेल्या टास्क फोर्सचा अहवाल सरकारने विचारात घ्यावा, असेही सुखथनकर यांनी म्हटलं होतं. कोरोनाच्या संकटात डळमळीत झालेल्या अर्थव्यवस्थेला गती मिळण्यासाठी रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प महत्वाचा आहे. त्यामुळे या प्रकल्पाबद्दलचा विचार लवकर व्हावा, असा सल्ला सुखथनकर यांनी राज्य सरकारला दिला होता.

समितीची शिफारस

कोरोना काळातील संकटात अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्स नेमली होती. या टास्क फोर्समध्ये पुणे इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष रघुनाथ माशेलकर, उपाध्यक्ष विजय केळळकर यांच्यासह अनेक दिग्गज मंडळींचा समावेश होता. रोजगार वाढवण्यासाठी आणि गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यासाठी रत्नागिरी रिफायनरी सुरु करण्याची या टास्क फोर्सने शिफारस केली होती. माहिती आणि जनसंपर्क सहसंचालयाच्या महासंवादच्या पेजवर टास्क फोर्सची अधिकृत माहिती देण्यात आली होती. (shivsena leader vinayak raut met Ratnagiri refinery supporter in ratnagiri)

 

संबंधित बातम्या:

रत्नागिरी रिफायनरीच्या समर्थनार्थ मतदान, शिवसेना नगरसेविकेची पक्षातून हकालपट्टी

‘सरकार पडेल, पण रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प होणारच’, भाजप नेत्याचं शिवसेनेला आव्हान

‘नाणार’मध्ये मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांनाच भूखंडाचे श्रीखंड; निलेश राणेंचा दावा

(shivsena leader vinayak raut met Ratnagiri refinery supporter in ratnagiri)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI