जातीधर्माच्या भिंती मोडणाऱ्या माणुसकीच्या कार्याचा गौरव, वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अब्दुल जब्बार यांचा सत्कार

एकीकडे हिंदु - मुस्लीम वादाच्या शेकोटीवर पोळी भाजण्याची स्पर्धा लागली असताना यवतमाळच्या अब्दूल जब्बार या अवलियाने कोरोनाकाळात कोरोनाने मृत्यू झालेल्या 1500 पेक्षा मृतदेहांचे अंत्यसंस्कार केले.

जातीधर्माच्या भिंती मोडणाऱ्या माणुसकीच्या कार्याचा गौरव, वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अब्दुल जब्बार यांचा सत्कार
अब्दूल जब्बारचा सत्कार

वाशिम: एकीकडे हिंदु – मुस्लीम वादाच्या शेकोटीवर पोळी भाजण्याची स्पर्धा लागली असताना यवतमाळच्या अब्दूल जब्बार या अवलियाने कोरोनाकाळात कोरोनाने मृत्यू झालेल्या 1500 पेक्षा मृतदेहांचे अंत्यसंस्कार केले. या जब्बारच्या माणुसकीची वाशिम येथील दोन व्हाट्सअप ग्रुपने दखल घेवून जब्बार च्या माणूसकीला 50 हजारांची मदत देवून माणसाने माणसाला एक माणुसकीला सलाम केला आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी षण्मुखराजन एस यांच्या हस्ते रोख रक्कम,सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन अब्दुल जब्बार यांना सपत्निक सन्मानित करण्यात आले.

दीड हजार मृतदेहांवर अंत्यसंस्कार

गतवर्षी एप्रिल महिन्यात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. दररोज शेकडो लोक मृत्युमुखी पडत होते. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत रांगा लागल्या होत्या. कोरोनाच्या भीतीमुळे अनेकजण नातेवाईकांवर अंत्यसंस्कार करायला धजावत नव्हते. अश्या कालखंडात यवतमाळमध्ये माणुसकीचा आविष्कार बघायला मिळाला. यवतमाळ येथील हिंदू स्मशानभूमीत दररोज कोरोनाने मृत्यू झालेले चाळीस ते पन्नास मृतदेह येत होते. या मृतदेहांवर हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यासाठी या स्मशानभूमी शेजारीच राहणारे अब्दूल जब्बार अब्दुल सत्तार ,शेख अहेमद शेख गुलाम या युवकांसह त्यांचे सहकारी पुढे आले. या मुलांनी वर्षभरात दीड हजारांवर मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. या मुलांच्या या मानवतावादी कार्याची माहिती वाशिम येथील शंभूराजे व्हाट्स अप ग्रुप व मराठा सेवा संघ व्हाट्स अप ग्रुपच्या काही सदस्यांना मिळाली. यानंतर त्यांनी ग्रुपवर याबाबत चर्चा केली. आणि त्या मुलांच्या कार्याची प्रशंसा व सन्मान करण्यासाठी ग्रुपच्या वतीने प्रत्येक सदस्यांने आपापल्या परीने आर्थिक मदत दिली. यामध्ये दोन्ही ग्रुपमध्ये 50 हजार रुपयांची मदत जमा झाली.

मानवतावादी कार्य प्रेरणादायी

सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी षण्मुखराजन एस यांच्या हस्ते जमा केलेली मदतनिधी अब्दूल जब्बार यांना सुपूर्द करुन त्यांना सपत्निक सन्मानित करण्यात आले. कोरोनाच्या भयावह परिस्थितीत जातीधर्माच्या भिंती भेदून केलेले मानवतावादी कार्य खरोखरच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. अश्याप्रकारे त्या युवकांच्या कार्याचा गौरव करणारे सन्मानपत्र अब्दुल जब्बार यांना जिल्हाधिकारी यांनी सुपूर्द केले.

यावेळी मराठा सेवा संघ व्हाट्स अप ग्रुपचे ऍडमिन विजय बोरकर, शंभूराजे व्हाट्स अप ग्रुपचे ऍडमिन गजानन धामणे ,मुख्याध्यापक प्रशांत देशमुख, प्रा. राम धनगर, गजानन खंदारे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गजानन भोयर,यवतमाळ येथिल पत्रकार प्रसाद नायगावकर आदींची उपस्थिती होती.

फुले, शाहू,आंबेडकरी विचारधारेच्या वैचारिक चळवळीत कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपल्या व्हाट्स अप ग्रुपच्या माध्यमातून  यवतमाळ येथील मुस्लीम युवकांच्या मानवतावादी कार्याची यथायोग्य दखल घेऊन त्यांना सन्मानित केल्यामुळे अब्दुल जब्बार  व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

इतर बातम्या:

Maharashtra HSC Result 2021 Date: बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली, दुपारी 4 वाजता निकाल जाहीर होणार

Sanjay Raut : खासदार संजय राऊतांनी घेतली राहुल गांधींची भेट, राऊत-गांधी भेटीमागचं कारण काय?

Washim Collector felicitate Abdul Jabbar for done 1500 funeral rights of corona patients

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI