बीडमध्ये ऑक्सिजन तुटवड्यामुळे ऑक्सिजन निर्मिती प्लांटच हलवला; धनंजय मुंडेंचा मोठा निर्णय

परळीच्या थर्मल पावर प्लांटमधील युनिट क्र. 8 चा ऑक्सिजन निर्मिती प्लांट अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात शिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. Beed moved the oxygen production plant

  • महेंद्रकुमार मुधोळकर, टीव्ही 9 मराठी, बीड
  • Published On - 23:24 PM, 15 Apr 2021
बीडमध्ये ऑक्सिजन तुटवड्यामुळे ऑक्सिजन निर्मिती प्लांटच हलवला; धनंजय मुंडेंचा मोठा निर्णय
धनंजय मुंडे, सामाजिक न्याय मंत्री

बीड: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बीड जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालाय. ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी महावितरणच्या वरिष्ठ यंत्रणेशी चर्चा करून ऑक्सिजन निर्मिती प्लांट हलवण्याचे ठरवले. परळीच्या थर्मल पावर प्लांटमधील युनिट क्र. 8 चा ऑक्सिजन निर्मिती प्लांट अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात शिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. (Oxygen shortage in Beed moved the oxygen production plant itself; Dhananjay Munde big decision)

दर तासाला 86 हजार लिटर ऑक्सिजन हवेतून वेगळा करण्याची क्षमता

थर्मल पावर प्लांटमधील या ऑक्सिजन निर्मिती प्लांटद्वारे दर तासाला 86 हजार लिटर ऑक्सिजन हवेतून वेगळा करण्याची क्षमता आहे. त्यामुळे अंबाजोगाई येथील एसआरटी ग्रामीण रुग्णालयात 24 तासांत साधारण 300 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर तयार होईल आणि यामुळे येथील ऑक्सिजनचा तुटवडा कायमचा मिटणार आहे.

केंद्रातील युनिट क्र. 6 आणि 7 मधील ऑक्सिजन प्लांट पूर्ववत राहतील

परळी औष्णिक विद्युत केंद्रात वीजनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यात शेवाळ साठून पाणी खराब होऊ नये, यासाठी हा ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यात येतो. केंद्रातील युनिट क्र. 6 आणि 7 मधील ऑक्सिजन प्लांट पूर्ववत राहतील. युनिट क्र. 8 मधला प्लांट मात्र अंबाजोगाई ला शिफ्ट करण्यात येत आहे.

एसआरटी रुग्णालयात यासाठी लागलेल्या जागेची पाहणी

या प्लांटला कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असणारी सामग्री परळी थर्मल प्लांट प्रशासनाकडे प्राप्त झाली असून, एसआरटी रुग्णालयात यासाठी लागलेल्या जागेची पाहणी करण्यात आली आहे. उद्या (शुक्रवार) ही सामग्री अंबाजोगाई येथे पाठवण्यात येईल व येत्या 10 दिवसांत या प्लँटद्वारे प्रत्यक्ष ऑक्सिजन निर्मितीला सुरुवात होईल, अशी माहिती थर्मल केंद्राचे मुख्याधिकारी मोहन आव्हाड यांनी दिली. आव्हाड यांनी ना. मुंडे यांच्या सूचनेनुसार एसआरटीमध्ये जाऊन जागेची पाहणी केली; यावेळी उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, एसआरटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुकरे आदी उपस्थित होते.

ऑक्सिजन रिसिव्हर टॅंकची क्षमता एकावेळी 20 हजार लिटर इतका ऑक्सिजन साठवून ठेवण्याइतकी

एसआरटी रुग्णालयातील ऑक्सिजन रिसिव्हर टॅंकची क्षमता एकावेळी 20 हजार लिटर इतका ऑक्सिजन साठवून ठेवण्याइतकी आहे, त्यामुळे येथे आता ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. महावितरणामार्फत आलेल्या या सामग्रीचा वापर करून ऑक्सिजन निर्मिती प्लांट अंबाजोगाईला शिफ्ट करण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्याधिकारी मोहन आव्हाड, उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, एसआरटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुकरे यांनी वेगाने सूत्रे हलवली. त्यामुळे ऑक्सिजन निर्मिती प्लांट सुरू करण्याचे काम उद्यापासून सुरू होणार आहे.

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! आता मुंबईच्या हाफकीन संस्थेत लसनिर्मिती होणार, केंद्र सरकारची परवानगी

कोरोनामुळे पोहरादेवी येथील यात्रा रद्द; भाविकांसाठी जिल्ह्याच्या सीमा राहणार बंद

Oxygen shortage in Beed moved the oxygen production plant itself; Dhananjay Munde big decision