धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर; आघाडी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

700 रुपयांचे अतिरिक्त बोनस जाहीर करीत आता 2500 रुपये दराने धान खरेदी करण्यासाठी सरकारने निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे मदत, पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दिली.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:51 PM, 19 Nov 2020
We will discuss electricity bill issue in cabinet meeting says Vijay Wadettiwar

मुंबई : पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज 19 नोव्हेंबरला राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत धान खरेदीमध्ये सुरू असलेल्या 1800 रुपये हमीभावात थेट 700 रुपयांचे अतिरिक्त बोनस जाहीर करीत आता 2500 रुपये दराने धान खरेदी करण्यासाठी सरकारने निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे मदत, पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दिली.(Paddy Growers Rs 700 Bonus Announced)

पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यातील काही भागात धानाचे पीक घेतले जात असून, यावर्षी चांगले उत्पादन मिळणार, असे दिसत होते. पण परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानं शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर तथा वर्धा या पाचही जिल्ह्यांत धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर असून, वर्षाकाठी हा एकमेव पीक या जिल्ह्यामध्ये घेण्यात येत असल्याने यावर शेतकऱ्यांची आर्थिक घडी अवलंबून आहे.

या जिल्ह्यामध्ये विशेषतः चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्यांत यंदा धान पिकावर अतिवृष्टी, पूरस्थिती आणि रोगराई या नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. येथील विदारक परिस्थितीची पाहणी विजय वडेट्टीवार यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहणी केली आणि स्वतः च्या विभागाकडून मदतसुद्धा जाहीर केली. शेतकऱ्यांना भरीव मदत मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे राज्य सरकारने पत्र पाठविले असता, थेट केंद्रीय पथकही येऊन गेले.

मात्र केंद्राकडून अद्याप ठोस अशी भरीव मदत मिळालेली नाही. एकंदरीत ही परिस्थिती बघता विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या धान पिकाला हमीभाव वाढवून देण्यासाठी मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव ठेवला. त्यानुसार आज महाविकास आघाडी सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी 700 रुपयांचे बोनस देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मागील वर्षी असलेल्या 1800 रुपयांचे हमीभाव कायम असले तरी त्यात 700 रुपये बोनसची भर पडल्याने आता शेतकऱ्यांकडील धान खरेदी ही 2500 रुपये दराने होणार आहे . त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आज मोठा दिलासादायक निर्णय ठरला असल्याचे मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

संबंधित बातम्या

गोंदियात अखेर 38 दिवस उशिरानं शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू; शेतकऱ्यांना दिलासा

‘शेतकरी-ग्राहक कंगाल, व्यापारी मालामाल’, लॉकडाऊनचा सर्वात जास्त फायदा धान्य व्यापाऱ्यांना