Pandharpur | चंद्रभागा तिरी नीरव शांतता, विठ्ठल मंदिराबाहेर शुकशुकाट, वैष्णवांच्या गर्दीने फुलणारी पंढरी सुनीसुनी

आषाढी एकादशीला लाखो वैष्णवांच्या गर्दीने गजबजणाऱ्या पंढरीत आज नीरव शांतता दिसत आहे (Pandharpur Ashadhi Ekadashi Wari 2020).

Pandharpur | चंद्रभागा तिरी नीरव शांतता, विठ्ठल मंदिराबाहेर शुकशुकाट, वैष्णवांच्या गर्दीने फुलणारी पंढरी सुनीसुनी

पंढरपूर :  आषाढी एकादशीला लाखो वैष्णवांच्या गर्दीने गजबजणाऱ्या पंढरीत आज नीरव शांतता दिसत आहे (Pandharpur Ashadhi Ekadashi Wari 2020). मंदिर परिसर आणि शहरातही शुकशुकाट आहे. चंद्रभागेच्या पवित्र काठी देखील शांतता आहे. मंदिर परिसर आणि शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. एरव्ही लाखोंच्या संख्येने गजबजलेल्या पंढरीला आज पोलीस छावणीचे स्वरुप आले. शहरात द्वादशीपर्यंत संचारबंदी राहणार आहे.

कोरोना संकटामुळे यंदा आषाढी एकादशीची पंढरपूरची यात्रा रद्द झाली. मात्र, परंपरेनुसार संतांच्या मानाच्या नऊ पालख्या काल (मंगळवारी) रात्री पंढरपुरात दाखल झाल्या. प्रत्येक पालखीसोबत फक्त 20 वारकरी पंढरपुरात आले आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पायी वारी रद्द करण्यात आली. त्यामुळे सर्व मानाच्या पालख्या एसटी बसने पंढरपुरात दाखल झाल्या.

संत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदी येथून आली. संत तुकाराम महाराज यांची पालखी देहू येथून पंढरपुरात दाखल झाली. त्याचबरोबर संत एकनाथ महाराजांची पालखी पैठणहून, संत नामदेव महाराजांची पालखी सोलापूरहून, संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वरहून, संत निळोबाराय यांची पालखी पिंपळनेर येथून तर मुक्ताईनगर येथून संत मुक्ताबाई यांची पालखी पंढरपुरात दाखल झाली. त्याचबरोबर सोपानदेव यांचीदेखील पालखी पंढरपुरात दाखल झाली.

संताच्या पालख्यांची रात्री वाखरी येथे भेट झाली. त्यानंतर सर्व पालख्या पंढरपूरच्या दिशेला रवाना झाल्या. सर्व संतांच्या पादुकांचं मोठ्या भक्तीभावाने चंद्रभागेत स्नान करण्यात आलं. यावेळी मोजकेच वारकरी बघायला मिळाले. यावेळी पोलीस देखील वारकऱ्यांसोबत होते. पादुकांच्या स्नाननंतर सर्व पादुका नगर प्रदक्षिणा करतील.

परंपरेनुसार संतांच्या पादुका पौर्णिमेचा काला करुन परत जातात. मात्र, या वर्षी सरकारने फक्त स्नान आणि नगर प्रदक्षिणेला परवानगी दिली आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला परत माघारी जाण्याचे नियोजन केलं आहे. पण, वारकरी सांप्रदायाने त्यावर विरोध दर्शवला आहे. शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार पौर्णिमेचा काला करुनच परत जाण्याची मागणी वारकऱ्यांनी केली आहे. याबाबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत आजच नरोप पोहचवू, असा शब्द पालखी सोहळ्यासोबतच्या मानकऱ्यांना दिला आहे.

दरम्यान, पंढरपुरात आज पहाटे विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी विठुमाऊलीच्या जयघोषात मंदिराचा गाभारा दुमदुमून गेला. पहाटे तीन वाजून 40 मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा झाली. यंदा मानाचे वारकरी म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या पाथर्डी येथील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांना मान मिळाला.

संबंधित बातमी : पंढरपुरात मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *