पंजाबराव डख यांचा पावसाचा अंदाज : कुठे रिमझिम, कुठे हलक्या सरी… मराठवाडा मात्र कोरडाच?
Panjabrao Dakh Maharashtra Rain forecast : पंजाबराव डख यांनी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यात त्यांनी पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात पावसाची स्थिती काय असेल? यावर भाष्य केलं आहे. कुठे रिमझिम, कुठे हलक्या सरी... असा पाऊस होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. वाचा...
जुलै महिना संपत आला आहे. मागच्या 10-12 दिवसात पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढलं आहे. अशात आता येत्या काळात पाऊस कसा असणार आहे? किती पाऊस असणार आहे? याबाबत हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी त्यांचा अंदाज व्यक्त केला आहे. पंजाबराव डख यांनी पुढच्या पाच दिवसात कोणत्या भागात आणि किती पाऊस पडणार आहे, याचा अंदाज वर्तवला आहे. मराठवाड्यात पावसाचा अंदाज काय असेल? यावर पंजाबराव डख यांनी भाष्य केलं आहे.
मागच्या 10- 12 दिवसात पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढलं आहे. महाराष्ट्रभर जोरदार पाऊस झाला. मुंबईची पुन्हा एकदा तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं. पुण्यात तर पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचलं होतं. एकता नगर भागात पावसाच्या पाण्यामुळे अनेकांचं नुकसान झालं आहे. गडचिरोलीत तर प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे 50 रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. नद्या ओसंडून वाहत होत्या. अशातच आता येत्या काळात पाऊस कसा असेल. याबाबत पंजाबराव डख यांनी अंदाज वर्तवला आहे.
पावसाचा अंदाज
पुढचे पाच दिवस मराठवाड्यात पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. हलक्या सरींचीच हजेरी राहणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.आयएमडीने मराठवाड्यात पुढील पाच दिवस हलक्या पावसाची शक्यता असल्याचं सांगितलं आहे. आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला. पुढील पाच दिवस मराठवाड्यात नुसतीच भूरभूर राहणार असल्याचं समोर येतंय, असं पंजाबराव डख यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस मराठवाडा कोरडाच राहणार आहे का? अशी चिंता सतावते आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या नुसतेच ढगाळ वातावरण आहे. दिवसभर भूरभूर पावसाची हजेरी आहे. तरिही हजारो गावांची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आता केवळ 6. 26 टक्क्यांवर गेला आहे. मागील चार- पाच दिवसात झालेल्या पावसामुळे दोन टक्क्यांनी ही पाणीपातळी वाढली आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस?
मराठवाड्यातील कोणत्या विविध जिल्ह्यात जुलैच्या अखेरपर्यंत चांगला पाऊस झाला आहे. मराठवाड्यात 55. 9% पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस हा बीड जिल्ह्यात झालाय. बीड 66.8%, छत्रपती संभाजीनगर 59.2 %., जालना 57.4 %, लातूर 61.2%, धाराशिव 65.5%, नांदेड 49.2 %, परभणी 48.7 %, हिंगोली 47 % इतका पाऊस झाला आहे.