बापासाठी काहीही! बैलाचा खर्च परवडत नाही, लेकींनी कोळपं पाठीवर घेतलं

सततच्या दुष्काळामुळे शेतकर्‍यांच्या लेकरांना शिक्षण सोडावं लागल्याचं आपण पाहिलंय. स्वप्नांवर पडदा ओढून आई-वडिलांना शेतात हातभार लावण्यासाठी शेतकऱ्यांची लेकरं आता जनावरांप्रमाणे कष्ट करत आहेत. दुष्काळ या सर्वांमागचं कारण आहे.

बापासाठी काहीही! बैलाचा खर्च परवडत नाही, लेकींनी कोळपं पाठीवर घेतलं

परभणी : दुष्काळामुळे शेतकर्‍यांची अवस्था किती बिकट झाली हे सांगण्यासाठी परभणी जिल्ह्यातील एक चित्र पुरेसं आहे. परभणी जिल्ह्यातील पिंगळी (Pingali Parbhani) गावात शेती कामासाठी बैल नसल्याने शेतकर्‍याने स्वतःसह लेकींना कोळप्याला जुंपलंय. तर पत्नीला कोळपं हाकायच्या कामाला लावलंय. सततच्या दुष्काळामुळे शेतकर्‍यांच्या लेकरांना शिक्षण सोडावं लागल्याचं आपण पाहिलंय. स्वप्नांवर पडदा ओढून आई-वडिलांना शेतात हातभार लावण्यासाठी शेतकऱ्यांची लेकरं आता जनावरांप्रमाणे कष्ट करत आहेत. दुष्काळ या सर्वांमागचं कारण आहे.

बाप-लेकीचं नातं किती अभेद्य असतं हे आपण अनेकदा पाहिलंय. पण दुष्काळाच्या चक्रात पिचलेल्या बापाने आपल्या लाडक्या लेकींनाच कोळप्याला जुंपल्याचं हृदयद्रावक चित्र परभणी जिल्ह्यात पाहायला मिळतंय. जिल्ह्यातील पिंगळी येथील बाबुराव राठोड या शेतकर्‍याने देवस्थानची 7 एकर जमीन ठोक्याने केली. त्यात उसनवारी करून पेरणी केली. पीकही उगावलं, पण कोळपणी करायला बैल नाहीत आणि एकरी एक हजार रुपये कोळपणीला द्यायला परवडत नाहीत. त्यामुळे या कर्जबाजारी पित्याला स्वतःच्या लाडक्या लेकींना कोळप्याला जुंपण्याची वेळ आली.

बाबू राठोड यांच्या कुटुंबात आठ सदस्य आहेत, ज्यात पाच मुली आणि एक मुलगा आहे. घरची शेती नाही, कुणाचीही शेती ठेक्याने करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. पण सलगच्या दुष्काळामुळे शेती हा व्यवसाय तोट्यात आल्याने 4 वर्षापूर्वी बाबुराव कर्जबाजारी झाले. ते कर्ज फेडण्यासाठी पाचही लेकरांच्या हातातील पेन सुटून कोयते हातात आले. आई-वडिलांच्या लाडक्या लेकींना ऊस तोडण्याचं काम करावं लागलं. इतकच कमी की काय म्हणून आता या रंणरागिनींनी अनवाणी पायांनी स्वतःला कोळप्याला जुंपून बापाचं कर्ज फेडण्याचं व्रत घेतलंय.

अल्प पावसामुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्यात चार वर्षाच्या दुष्काळामुळे शेतकर्‍यांची सुरू असलेली आर्थिक फरफट पाहता शेतकर्‍यांची अवस्था काय आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पेरणी झाली तरी पाऊस पडेल की नाही आणि पेरलेलं बीज उगवून येईल की नाही याची शाश्वती नाही. बियाण्यांसाठी हजारो रुपयांची गुंतवणूक करुन धाकधूक वाढते. पीक उगवून आल्यानंतरही मशागतीसाठी अनेक शेतकऱ्यांना खर्च परवडत नाही. यातूनच लेकरांची शाळा सुटते आणि हातातला पेन सोडून आई-वडिलांसोबत शेतात कष्ट करावे लागतात.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *