पवार कुटुंबातले सगळे प्रचारासाठी फिरतायत, घरात कुणी भेटेना चहा प्यायला : चंद्रकांत पाटील

पवार कुटुंबातले सगळे प्रचारासाठी फिरतायत, घरात कुणी भेटेना चहा प्यायला : चंद्रकांत पाटील

पुणे : महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि मावळचे उमेदवार पार्थ पवार यांच्यावरुन पवार कुटुंबाला टोला लगावलाय. पवार कुटुंबातले सध्या सगळेच प्रचारासाठी फिरत आहेत, कुणीही चहा प्यायलाही घरात भेटत नाही, असं ते म्हणाले. शिवाय मुलाला निवडणुकीत उतरवून अजित पवार फसले आहेत, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

बारामतीच्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुप्यात सभा झाली. या सभेसाठी इतर नेत्यांसह चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. त्यांच्या भाषणात त्यांनी पवार कुटुंबावर निशाणा साधला. शिवाय अनेक वर्षांपासूनची प्रलंबित कामं मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावली आहेत, त्यामुळे आता राष्ट्रवादीचा पराभव निश्चित आहे, असा दावा त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांची सभा सुरु होण्यापूर्वी सुप्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यावरुनही चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला. ज्या शरद पवारांनी वर्षानुवर्षे सुपा भाग दुष्काळी केला, त्या भागात मुख्यमंत्र्यांचं आगमन होताच पाऊस आला. सुप्रिया सुळे पडणार म्हणून सगळेच आनंदी, असंही ते मिश्कील शैलीत म्हणाले.

या जन्मी जे कराल ते इथेच फेडावं लागेल. शरद पवारांनी आतापर्यंत जे केलं त्याची फेड त्यांना करावीच लागेल, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

पार्थ पवारांना निवडणूक रिंगणात आणून अजित पवार फसले आहेत. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी मावळचे युतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंना मिठी मारली. तेव्हाच पार्थ पवारांचा पराभव निश्चित झाला होता. या लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबातला एकही सदस्य नसेल. वर्षानुवर्षे रेंगाळेलेले सामाजिक प्रश्न मुख्यमंत्र्यांनी सोडवलेत. बारामतीत मतदारांनी पराक्रम करावा. पवार कुटुंबातले सगळे प्रचारासाठी फिरतायत, घरात कोणीही भेटेना चहा प्यायला, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *