
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. याप्रकरणी विविध नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर या दोघांना अटक करण्यात आली असून, त्ंयाच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. आता याप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी मृत डॉक्टरच्या बीड येथील मूळ गावी जाऊन कुटुंबियांची भेट घेत संपूर्ण घटनेची माहिती घेतली.
या भेटीनंतर आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप केले. तसेच या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली, मृत डॉक्टरवर फेब्रुवारी महिन्यापासून तिथले पोलीस अधिकारी सातत्याने चुकीची कामे करण्यासाठी दबाव टाकत होते. डॉक्टरने पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि डीवायएसपींकडे वारंवार तक्रार करूनही तिचे कोणी ऐकले नाही आणि ती एकटी पडली, असा दावा सुरेश धस यांनी केला.
याप्रकरणी केवळ अटक झालेल्या दोघांवर कारवाई करून पुरेसे नाही. बदने आणि बनकर यांच्याव्यतिरिक्त जे जे अधिकारी, कर्मचारी किंवा इतर कोणी यात दोषी असतील, त्यांनाही आरोपी म्हणून घेतले पाहिजे. या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासासाठी एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एसआयटी (SIT) स्थापन करण्यात यावी आणि या समितीत सर्व कर्मचारी महिला असावेत, अशी मागणी धस यांनी केली. याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले.
आमदार सुरेश धस यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. पोलीस बदने हे खुर्चीवर बसून डॉक्टरला धमक्या देत होते. तसेच, फिटनेस सर्टिफिकेट देण्यावरूनही वाद झाला होता. विशेष म्हणजे, काही कर्मचाऱ्यांनी तुमचे बीडचे लोक असे… असे म्हणून डॉक्टरला हिणवण्याची भूमिका घेतली होती. रात्री अपरात्री फक्त तिलाच का बोलावले जात होते? बाकीचे मेडिकल ऑफिसर नव्हते का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, कुटुंबीयांना मुलगी फक्त पीएम रूममध्येच दाखवण्यात आली, असेही त्यांनी सांगितले.
आमदार सुरेश धस यांनी या आत्महत्येबाबतची संपूर्ण माहिती घेऊन त्या डॉक्टरला न्याय मिळेपर्यंत शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच, कागदोपत्री लढा देत हा मुद्दा विधानसभेतही उपस्थित करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.