फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवे वळण, करुणा शर्मांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
फलटण येथील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात स्वराज्य शक्ती सेनेच्या करुणा शर्मा-मुंडे यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी संपदाचा मृत्यू हत्या असल्याचा संशय व्यक्त करत, डीवायएसपी आणि डीन यांना सह-आरोपी करण्याची मागणी केली.

फलटण येथील डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी रोज नवनवीन खुलासे येत आहेत. त्यातच आता स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या करुणा शर्मा-मुंडे यांनी टीका केली आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करत करुणा शर्मा यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी थेट डीवायएसपी (DYSP) आणि डीन (Dean) यांनाही सह-आरोपी करण्याची मागणी केली आहे, तसेच पीएम (Post Mortem) रिपोर्टमध्ये बदल करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी करुणा मुंडेंनी केली आहे.
करुणा मुंडेंनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी करुणा मुंडे यांनी मागणी केली आहे की, संपदा मुंडे प्रकरणात डीवायएसपी आणि डीन यांनाही सह-आरोपी बनवावे. तसेच पोस्टमॉर्टम रिपोर्ट कोणाच्या सांगण्यावरून बदलले जात होते, याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. संपदा मुंडे यांचा मृत्यू आत्महत्या नसून हत्या आहे, असा संशय करुणा मुंडेंनी व्यक्त केला.
खरा मास्टर माईंड फलटणचा आका शोधायला पाहिजे
यावेळी त्यांनी या हत्येच्या पाठीमागे निंबाळकर यांचा हात आहे. याचा खरा मास्टर माईंड फलटणचा आका शोधायला पाहिजे, तरच संपदाताईला न्याय मिळेल. निंबाळकर यांच्या विरोधात खूप मोठे व्हिडिओ जनतेसमोर आले आहेत, यावरही करुणा मुडेंनी भाष्य केले.
करुणा मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आव्हान केले आहे. मी बीड जिल्ह्याच्या सहा आमदारांना आव्हान करते की “आपल्या जिल्ह्याची मुलगी आज तिच्यावरती अन्याय झाला आहे, तुमच्या घरामध्ये पण आई-बहीण असेल. आपल्या बीडच्या मुलीवर जो अन्याय झाला आहे, त्यासाठी आपण आवाज उठवावा. महाराष्ट्रामध्ये जिथे-जिथे आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी जाऊन मी भेट देत आहे. मी आमदार, पालकमंत्री यांना सुद्धा आव्हान करते की आपण त्या ठिकाणी भेट द्यावी, असे करुणा मुंडे म्हणाल्या.
स्वराज्य शक्ती सेना गप्प बसणार नाही
यावेळी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. तुम्ही जी डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर चिखल फेक केली आहे, जोपर्यंत रूपाली ताईचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत स्वराज्य शक्ती सेना गप्प बसणार नाही,” असा इशारा करुणा मुंडे यांनी दिला. या प्रकरणाच्या संदर्भात स्वराज्य शक्ती सेनेने कोर्टात दाद मागितली असल्याची माहिती करुणा मुंडे यांनी दिली. तसेच, याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी ७ नोव्हेंबरला छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
