केंद्र सरकार सोन्याची अंडी देणारी कोंबडी विकायला निघाले : प्रकाश आंबेडकर

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात प्रकाश आंबेडकर यांनी 24 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

केंद्र सरकार सोन्याची अंडी देणारी कोंबडी विकायला निघाले : प्रकाश आंबेडकर

पुणे : “केंद्र सरकारची अवस्था दारुड्यासारखी झाली आहे. दारु मिळाली नाही तर दारुड्या जसा घरातील वस्तू विकतो त्याप्रमाणे हे सरकार भारत पेट्रोलियम कंपनी विकायला निघाले आहे. भारत पेट्रोलियम ही सरकारला सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. मात्र केंद्र सरकार या कंपनीला विकायला निघाली आहे”, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात प्रकाश आंबेडकर यांनी 24 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी काल (18 जानेवारी) पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्र बंदला विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा असल्याचे म्हटले. “महाराष्ट्र बंद करुन झोपलेल्या सरकारला जागे करु, हे बंद शांततेने करणार आहोत”, असे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्र बंदला पोलीस परवानगी मागितली आहे का? असा प्रश्न विचारला असता, “मी कुणाकडेही परवानगी मागत नाही”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 24 जानेवारीच्या महाराष्ट्र बंदला 35 संघटनांचा पाठिंबा आहे, असे आंबेडकर म्हणाले. “राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाण्याऐवजी लोकांनी हक्काच्या वंचित बहुजन विकास आघाडीच्या झेंड्याखाली आंदोलन करावे”, असे आवाहन प्रकाश आंबेडक यांनी केले. “वंचित बहुजन आघाडी ही भाजपच्या चुकीच्या धोरणांना सातत्याने विरोध करत आहे. आतादेखील आम्ही भूमिका घेतली आहे. आमच्या नंतर इतर लोक भूमिका घेतील”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.