सर्पदंश झालेल्या पोराचं विष स्वत:च्या तोंडाने ओढलं, तरीही बापाची शर्थ हरली, मुलाचा मृत्यू!

प्रताप निवास पुणेकर असं सर्पदंशाने मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. 29 वर्षीय प्रतापचं चार महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं. सोमवारी 8 जुलै रोजी भातशेतीला खत घालण्यासाठी तो आई-वडिलांसोबत शेतात गेला होता. तिथे त्याला साप चावला.

सर्पदंश झालेल्या पोराचं विष स्वत:च्या तोंडाने ओढलं, तरीही बापाची शर्थ हरली, मुलाचा मृत्यू!
(प्रताप पुणेकर)

(प्रताप पुणेकर)

कोल्हापूर : शेतात राबत असताना तरण्याबांड पोराला साप चावला, अल्पावधीतच विष चढून मुलाला भोवळ येताच, शेतकरी बापाने थेट साप चावलेल्या ठिकाणी चावून, तोंडाने विष ओढलं. परिणामी दोघांनाही भोवळ आली. अवघड वाटेच्या शेतात कोण नसताना, आईने आरडाओरडा करुन माणसं जमवली आणि दोघांना रुग्णालयात हलवलं. मुलावर तीन-चार दिवस उपचार झाले. मात्र मुलाच्या अंगात विष इतकं भिनलं होतं की बापाचे शर्थीचे प्रयत्न हरले आणि चार दिवसांच्या उपचाराअंती मुलाचं निधन झालं. एखाद्या कथेला शोभावी अशी थरारक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील गिरगाव इथं घडली.

प्रताप निवास पुणेकर असं सर्पदंशाने मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. 29 वर्षीय प्रतापचं चार महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं. सोमवारी 8 जुलै रोजी भातशेतीला खत घालण्यासाठी तो आई-वडिलांसोबत शेतात गेला होता. तिथे त्याला साप चावला. सापाचा दंश होताच त्याने वडिलांना याबाबत सांगितलं. वडिलांनी तातडीने सर्पदंश झालेल्या ठिकाणाच्या वरच्या बाजूला काहीतरी बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र अल्पवधीतच प्रतापला भोवळ येऊ लागली. बापाला बांधण्यासाठी काही सापडेना.

त्यामुळे हतबल झालेल्या बापाला काय करु हे सुचेना. वडिलांनी थेट पोराला साप चावलेल्या ठिकाणी चावा घेऊन, स्वत:च्या तोंडाने विष ओढून बाहेर काढलं. मात्र सापाने घात केला. दोघांनाही भोवळ येऊ लागली. तोपर्यंत प्रतापच्या आईने रस्त्यावर जाऊन आरडा-ओरड करुन माणसं जमवली. जमलेल्या माणसांनी दोघांना रुग्णालयात हलवलं.

सुरुवातीला दोघांनाही कोल्हापुरातील सरकारी रुग्णालय- छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर ) हलवलं. तिथे प्रतापचे वडील निवास पुणेकर यांना दाखल करुन घेतलं. मात्र प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयाने प्रतापला खासगी रुग्णालयात हलवण्यास सांगितलं. प्रतापच्या अंगात विष भिनत होतं, तो अक्षरश: तडफडत होता. त्यामुळे सीपीआर प्रशासनाने व्हेंटिलेटर अभावी प्रतापला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यास सांगितलं.

सीपीआरमध्ये तीन व्हेंटिलेटर आहेत. त्या दिवशी तीनही व्हेंटिलेटर व्यस्त असल्याचं सीपीआर प्रशासनाने सांगितलं. 20 लाखाच्या घरात लोकसंख्या असलेल्या कोल्हापूरच्या सर्वात मोठ्या रुग्णालयात केवळ तीन व्हेंटिलेटर आहेत.

दरम्यान, प्रतापला खासगी रुग्णालयात तातडीने हलवलं. तिथे त्याच्यावर चार दिवस उपचार झाले. त्यादरम्यानच त्याच्या फुप्फुसात पाणी झाल्याचं सांगण्यात आलं. पुढे धोका वाढत गेला आणि डॉक्टरांनी डायलेसिसचा पर्याय सांगितला. पोराला वाचवण्यासाठी जे हवं ते करण्याची तयारी बापाची होतीच. त्यादरम्यान प्रतापची प्रकृती आणखी खालवली आणि त्याला पुन्हा तिसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र तब्बल चार दिवस मृत्यूशी झुंज देत असलेला प्रताप अखेर हरला. गुरुवारी संध्याकाळी त्याचं निधन झालं.

प्रतापच्या निधनाने कुटुंबीयांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. सर्पदंश हा गावखेड्यात सर्रास घडणारा प्रकार आहे, मग सरकारी रुग्णालयात त्याच्यावर उपचार का होऊ शकला नाही? कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात केवळ तीन व्हेंटिलेटर आहेत का? प्रताप तर गेला पण भविष्यात प्रतापसारखा प्रसंग अन्य कोणाला येऊ नये त्यासाठी उपाययोजना काय? सीपीआर रुग्णालय यासाठी काही ठोस पावलं उचलणार का?

एकंदरीत सध्या चांद्र मोहिम, मंगळावर पाणी शोधण्याचे प्रयत्न एकीकडे सुरु असताना, आजही साप चावल्याने अनेकांचा जीव जात आहे हा विरोधाभास विचार करायला लावणारा आहे.

Published On - 1:02 pm, Fri, 12 July 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI