‘कोणालातरी वाचवण्यासाठी खटाटोप, भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न’, मलिक यांच्या आरोपानंतर दरेकरांची टीका

ज्याचे मंत्री नवाब मलिक यांचे आरोप हे बिनबुडाचे आहेत. फक्त सनसनाटी निर्माण करून मूळ विषयाकडून विचलित करण्याचा उद्देशाने ते तथ्यहीन आरोप करत आहेl. सीबीआय, ईडी, एनआयए, एनसीबी या देशातील उत्तम तपास यंत्रणा आहेत. भाजपला बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात येत आहे, असे प्रविण दरेकर म्हणाले.

'कोणालातरी वाचवण्यासाठी खटाटोप, भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न', मलिक यांच्या आरोपानंतर दरेकरांची टीका
PRAVIN DAREKAR NAWAB MALIK

मुंबई : राज्याचे मंत्री नवाब मलिक यांचे आरोप हे बिनबुडाचे आहेत. फक्त सनसनाटी निर्माण करून मूळ विषयापासून विचलित करण्याच्या उद्देशाने ते तथ्यहीन आरोप करत आहेत. सीबीआय, ईडी, एनआयए, एनसीबी या देशातील उत्तम तपास यंत्रणा आहेत. भाजपला बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात येत आहे. पण नवाब मलिक यांना या तपास यंत्रणापेक्षा जास्त ज्ञान असेल व कायद्याची माहिती असेल तर त्यांनी आपल्याकडील माहिती कायद्याच्या चौकटीत सांगावी, असा टोला विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज लगावला.

एनसीबीने ताब्यात घेतलेल्या 11 जणांमध्ये रिषभ सचदेव, प्रतीक गाभा आणि आमिर फर्निचरवाला या तिघांना सोडण्यात आलं. या तिघांना का सोडण्यात आलं?, रिषभ सचदेव हा भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांचे नातेवाईक आहेत,’ असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना “या प्रकरणामध्ये जर एनसीबीने कोणाला सोडल्याचा मलिक यांचा दावा असेल तर तो तपासून पाहिला पाहिजे, कारण कायदा हा सर्वांना समान आहे मग तो कोणीही असो वा कोणत्याही राजकीय पक्षाचा असो. पण केवळ बिनबुडाचे आरोप करु नये. राज्याचे गृहमंत्री तुमचेच आहेत, त्यामुळे मुंबई पोलिस, महाराष्ट्र पोलिस यांच्या मार्फत संबंधितांचे मोबाईल कॉल तपासणं, अन्य माहिती घेण हे आपल्या सरकारला नियमानुसार करता येईल. परंतु माहिती न घेता केवळ अंधारात बाण मारण्याचा केविलवाणा प्रयत्न मलिक करत आहेत,” अशी टीका दरेकर यांनी केली.

…तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जबाबदार धरायच का ?

भाजपच्या नेत्याचा मेहुणा यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. विनाकारण भाजपवर दोषारोप होत आहे. परंतु आरोप अजून सिद्ध व्हायचे आहे. नवाब मलिक यांच्या जावयाला थेट एनसीबीने अटक केली आहे. मग याचा दोष आम्ही सासरे नवाब मलिक यांना द्यायचा का ? त्यांना दोषी धरायचं का ? असा सवाल दरेकर यांनी केला. तसेच आपण मोहित भारतीयच्या मेहुण्यावरून भाजपला जबाबदार धरण्याचा प्रयत्न करत आहात, मग आपल्या जावयाच्या अटेकसाठी आम्ही राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीला जबाबदार धरायच का ? ह्याचे उत्तरही नवाब मलिक यांनी द्यावं असेदेखील दरेकर म्हणाले.

मलिक कोणाला वाचवत आहेत ?

मंत्री नवाब मलिक जनतेला मूळ विषयांपासून विचलित करत आहेत. एनसीबीने ड्रग्स पार्टी प्रकरणात अनेक तरुणांना पकडलं आहे. या प्रकरणावरून नवी पिढी बरबाद होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्याला चाप बसवण्यासाठी अशी कारवाई अत्यंत महत्वाची आहे. परंतु कोणालातरी वाचवण्यासाठी व सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न नवाब मलिक करीत आहेत, असेदेखील दरेकर म्हणाले. तसेच नवाब मलिक यांच्या म्हणण्यानुसार तपास यंत्रणावंर आमचा विश्वास नाही. न्यायालयावरही विश्वास नाही. आमचा जनतेच्या न्यायालयावर विश्वास आहे त्यामुळे या सर्वांवरून असे दिसून येते की, मलिक केवळ रोज सनसनाटी आरोप करीत आहेत, असा दावा दरेकर यांनी केला.

भाजपला बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न

नार्कोटिक्स सेलच्या मध्ये ज्यांच्यावर आपल्याला संशय आहे, त्याबाबत आपण माहिती काढू शकतात. परंतु मलिक यांच्या जावयाला अटक केल्यापासून एनसीबीच्या संदर्भात ते अनेक तथ्यहीन वक्तव्य प्रसार माध्यमातून करत आहे. आपल्या जावयाला अटक झाल्यानंतर मोहित भारती यांच्या मेहुण्याचे नाव घेऊन विनाकारण भाजपला बदनाम करण्याचा मलिक यांचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीकाही दरेकर यांनी केली.

इतर बातम्या :

Shah Rukh Khan : NCB ने फास आणखी आवळला, आता शाहरुख खानच्या ड्रायव्हरला समन्स धाडलं!

महाराष्ट्र बंदमध्ये शिवसेना उतरणार की नाही? राऊतांनी धडक पत्रकार परिषदच घेतली

भंगाराचा व्यवसाय करता करता त्यांनी मतीही भंगारात विकलीय, नवाब मलिकांवर पडळकरांची टीका

(Pravin Darekar criticizes Nawab Malik said hi is trying to defame BJP in Cruise Rave Drugs Party case)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI