पुलवामातील जवानांच्या पोस्टिंगची माहिती बाळगली, चाकणमधून संशयित दहशतवादी ताब्यात

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:24 PM, 28 Mar 2019
पुलवामातील जवानांच्या पोस्टिंगची माहिती बाळगली, चाकणमधून संशयित दहशतवादी ताब्यात

पुणे : बिहार आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएसने पुण्यातील चाकणमध्ये मोठी कारवाई केली आहे. जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर जवानांच्या पोस्टिंग डिटेल्सची प्रिंट जवळ बाळगणाऱ्या संशयित दहशतवाद्यांच्या साथीदाराला चाकणमधून अटक करण्यात आली. पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने घेतली होती.

अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्याचं नाव शरियत मंडळ असं आहे. बिहारमधील पाटणा जंक्शन येथे बिहार एटीएसने खैरुल मंडल आणि अबू सुलतान या दोन बांगलादेशींना काही दिवसांपूर्वी अटक केली होती. या दोघांच्या चौकशीतून शरियत मंडलचं नाव समोर आलं. यानंतर बिहार एटीएसने महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने या संशयित दहशतवाद्याला अटक केली.

अटक केलेल्या संशयित दहशतवाद्याला पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी बिहार एटीएसच्या वतीने संशयित आरोपीच्या प्रवास कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने त्याला बिहारमध्ये चौकशीसाठी नेण्यासाठी 1 एप्रिल पर्यंत प्रवास कोठडी मंजूर केली आहे.

पुलवामात शहीद झालेल्या जवानांच्या पोस्टिंगची माहिती या संशयित दहशतवाद्यांकडे कशी आली याबाबत तपास सुरु आहे. बिहारमध्ये अटक केलेले दोघे आणि चाकणमधून ताब्यात घेतलेला शरियत मंडल हे तिघे इस्लामिक स्टेट बांगलादेश आणि आयसिससह जमीयत-उल-मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे सक्रीय सदस्य आहेत.