VIDEO: अजित पवारांची शिवसेनेच्या विरोधात भूमिका? गडकरींच्या लेटरबाँबवर पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या लेटरबाँबवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतली आहे. (ajit pawar)

VIDEO: अजित पवारांची शिवसेनेच्या विरोधात भूमिका? गडकरींच्या लेटरबाँबवर पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया
political leader


पुणे: केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या लेटरबाँबवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतली आहे. एखादा कंत्राटदार चांगलं काम करत असेल आणि राजकीय पक्षाचा आधार घेऊन किंवा एखाद्या पदाचा आधार घेऊन त्याला त्रास दिला जात असेल तर हा प्रकार ताबडतोब थांबवला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकाराची शहानिशा करतीलच, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. अजित पवारांनी शिवसेनेवर पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया व्यक्त केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (ajit pawar’s first reaction on Gadkari’s letter to CM Uddhav Thackeray)

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. राज्याच्या महामार्गाच्या कामात शिवसैनिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आडकाठी करत आहेत, असा गंभीर आरोप नितीन गडकरी यांनी केल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यावर पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. काल ही बातमी वाचली. आता तो आरोप आहे. त्यात तथ्य आहे की नाही हे तपासून पाहावं लागेल. मी 30-40 वर्षांपासून समाजकारण आणि राजकारणात आहे. मी नेहमी सांगतो हा जनतेचा पैसा असतो. त्याचा विनियोग व्यवस्थित झाला पाहिजे. कामाचा दर्जा चांगला राखला पाहिजे. तो राखला जात नसेल तर संबंधित कंत्राटदारावर कारवाई केली पाहिजे. जर यदाकदाचित कंत्राटदार त्या भागात चांगलं काम करत असताना काही जण कुठल्या तरी राजकीय पक्षाचा आधार घेऊन किंवा कुठल्या तरी मिळवलेल्या पदाचा आधार घेऊन कुणाला त्रास देत असेल तर तो त्रास ताबडतोब थांबवला गेला पाहिजे. म्हणून गडकरींनी मुख्यमंत्र्यांना त्याबाबतचं पत्रं दिलं आहे, असं पवार म्हणाले.

मुख्यमंत्री बारकाईने लक्ष घालतील

मी पावणे दोन वर्षापासून मुख्यमंत्र्यांसोबत काम करत आहे. त्यांचा कटाक्ष नेहमी कामाचा दर्जा चांगला राहावा असाच असतो. कोणतीही विकासाची कामे करताना पर्यावरण राखलं जावं, कामाचा दर्जा उत्तम असावा आणि वृक्षतोड टाळण्यावर मुख्यमंत्र्यांचा भर असतो. तसं ते अधिकाऱ्यांना सांगत असतात, असं सांगतानाच गडकरींनी जे आरोप केले आहेत त्यावर ते बारकाईने लक्ष घालतील, त्याची शहानिशाही करतील याबाबत मला शंभर टक्के खात्री आहे. त्यातील काय वस्तुस्थिती आहे तीही बाहेर येईल. पण कोणत्याही कार्यकर्त्याने, पदाधिकाऱ्याने, नागरिकांनी, ग्रामस्थाने विकास कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन त्यांनी केलं.

टास्क फोर्सच्या सूचनेनुसारच काम

यावेळी त्यांनी कोरोना संकटावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. कोरोनाचं संकट गेल्या दीड वर्षापूर्वी मार्चमध्ये आलं. त्यामुळे नवीन नवीन समस्या निर्माण झाल्या. हा आजार पहिल्यांदाच जगाने, देशाने आणि जनतेने पाहिला आहे. सर्व जण यामध्ये नवीन होते. प्रत्येकजण आपआपल्यापरिने काम करत आहे. कोणी लस शोधतंय, तर कोणी संशोधन करतंय. जी काही खबरदारी घ्यायची आहे, ती खबरदारी घेतली जात आहे. हे सर्व सुरू असताना सतत नवीन नवीन व्हायरस उद्भवत आहेत. टास्क फोर्सकडून जी माहिती मिळत आहे. त्यानुसार आरोग्य विभाग आणि प्रशासन काळजी घेण्याचं काम करत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. (ajit pawar’s first reaction on Gadkari’s letter to CM Uddhav Thackeray)

संबंधित बातम्या:

..तेव्हा गडकरींना शिवसेना कशी काम करते हे माहिती नव्हतं का?, नाना पटोलेंचा खोचक सवाल

12 सदस्यांच्या नियुक्तीसाठी सरकार आग्रह धरत नाही, तुम्ही का धरता?; राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला सुनावले

राजसाहेब, गजानन काळेंची मनसेतून तात्काळ हकालपट्टी करा, तृप्ती देसाईंची आक्रमक मागणी

(ajit pawar’s first reaction on Gadkari’s letter to CM Uddhav Thackeray)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI