बारामतीची जागा जिंकणारच, पवारांना मुख्यमंत्र्यांचं थेट आव्हान

  • Updated On - 4:29 pm, Fri, 5 July 19 Edited By:
बारामतीची जागा जिंकणारच, पवारांना मुख्यमंत्र्यांचं थेट आव्हान


पुणे: गेल्या लोकसभा निवडणुकीत 42 जागा जिंकल्या, मात्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितल्याप्रमाणे येत्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 43 जागा जिंकू. ही 43 वी जागा बारामतीची असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते पुण्यात भाजपच्या कार्यक्रमात बोलत होते.

आम्ही पूर्ण ताकदीने 48 जागा लढतोय. गेल्या लोकसभा निवडणुकीत 42 जागा जिंकल्या, आता 43 वी जागा बारामतीची जिंकणार. बारामतीत आता फक्त कमळ आणायचं आहे. गेल्या निवडणुकीत थोडक्यात विजय हुकला, पण यंदा बारामतीत कमळ फुलणारच, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

गेल्या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्यात झाली होती. त्यावेळी महादेव जानकर हे भाजपसोबतच्या युतीत होते, मात्र त्यांनी कमळाच्या चिन्हावर न लढता रासपच्या चिन्हावर निवडणूक लढली होती. त्या निवडणुकीत जानकर यांचा पराभव झाला होता.

त्याचाच दाखला देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीत बारामतीची जागा जिंकायची, कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढायची अशी घोषणा पुण्यात केली.

काहींना या निवडणुकीत मुलं बाळं इस्टिब्लीश अर्थात त्यांना स्थिरस्थावर करायचं आहे, ही निवडणूक देशाला योग्य दिशेची वाटचाल कायम ठेवण्यासाठी आहे, एकवीसाव्या शतकातील भारत तयार करायचा आहे. त्यासाठी एक तासही वाया जाऊ न देणारे नरेंद्र मोदींसारखे पंतप्रधान या देशाला कायम हवे आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काहींना पक्ष टिकवायचाय, तर काहींना आपली मुल इस्टाबलीश करायची आहेत. ही निवडणूक देशाला योग्य दिशेने नेऊन एकवीसाव्या शतकातील भारत तयार करायचा आहे. काही लढाया हरलो तर इतिहासात पारतंत्र्यात गेलो. देशाच्या आयुष्यात येणारी पंधरा वर्षे विकास गती राखली तर चीन आणि इतर देशांना मागे टाकू. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या काळात पॉलीस पॅरालसीस झाला होता. त्यामुळं आता मोदींसारखा पंतप्रधान पुन्हा हवा आहे. एकही दिवस, एकही वर्ष वाया गेले नाही पाहिजे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सत्तेसाठी नाही तर भारतासाठी ही लढत महत्वाची आहे. जगातील प्रगत देश म्हणतोय एकवीसावं शतक भारताचं असेल. मात्र वाजपेयींनंतर दहा वर्षे वाया गेली. मंगळावर यान पाठवतोय मात्र नागरिकांना शौचालयं नव्हते. गॅस नव्हता, पण मोदींनी ही विषमता दूर केली.

2019 – 24 या कालावधीत देश गरिब निर्मूलन होणार. अर्थसंकल्पात एक वर्षाचं नियोजन असते, मात्र या बजेटचा परिणाम अनेक वर्षावर होणार. 2030 चा भारत प्रगतशील देशाचा रोड मॅप सांगेल, असं मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं.

बूथप्रमुखांना सल्ला

बूथ प्रमुख कार्यकर्ते हे शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखे आहेत. प्रतापगडची लढाई महत्वाची आहे. छत्रपतींचं नियोजन महत्वाचे आहे.
शिवाजी महाराज यांनी रणनीती ठरवली, अफजल खानाचे 42 हजार सैनिक होते, मात्र महाराजांनी 12 हजार सैनिक पेरले. बूथ प्रमुखांसारखं नियोजन केले होते.
आपल्याला मतांची लढाई लढायची आहे. आपल्याला आपला किल्ला, चौकी जिंकायची आहे. अफजल खान नाही मात्र ही प्रवृत्ती कायम आहे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी बूथप्रमुखांना दिला.

VIDEO: