पुण्यात फॉर्च्युनर चोरांचा सुळसुळाट, 17 मिनिटात नगरसेवकाची कार पळवली

  • सागर आव्हाड, टीव्ही 9 मराठी, पुणे
  • Published On - 12:56 PM, 2 May 2019
पुण्यात फॉर्च्युनर चोरांचा सुळसुळाट, 17 मिनिटात नगरसेवकाची कार पळवली

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात महागाड्या फॉर्च्युनर कार चोरांचा सुळसुळाट झाला आहे. पुण्यात एका आठवड्यात तब्बल 5 फॉर्च्युनर कार चोरीला गेल्या आहेत. यात 3 नगरसेवकांच्या तर 2 व्यवसायिकांच्या गाड्यांचा समावेश आहे.

गुरुवारी 30 एप्रिलला मध्यरात्रीच्या सुमारास पुण्यातून दोन फॉर्च्युनर कार चोरी करण्यात आल्या. यातील एक कार ही कसबा पेठेतील नगरसेवक रवींद्र धांगेकर यांची आहे. याबाबत पुण्यातील फरासखाना आणि शिवाजीनगर याठिकाणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या पोलिस या कारबाबत तपास करत आहे.

चोरट्यांनी गुरुवारी 30 एप्रिलला कसबा पेठेत राहणाऱ्या राजवर्धन शितोळे यांची फॉर्च्युनर कार चोरली. त्याच कारमधून पुढे जात चोरट्यांनी पुणे पालिकेतील काँग्रेस समर्थक नगरसेवक रवींद्र धगेकर यांचे तोफखाना परिसरातील घर गाठले. त्यानंतर त्यांच्या घराजवळ उभी असलेली फॉर्च्युनर कार चोरट्यांनी चोरली. विशेष म्हणजे या दोन्ही फॉर्च्युनर गाड्या चोरण्यासाठी चोरांना केवळ 17 मिनिटे लागली. या चोरीच्या घटनेचे दृष्य सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले.

दरम्यान एक महिन्यापूर्वी भाजप नगरसेवक दीपक पोटे यांचीही फॉर्च्युनर कार अशाचप्रकारे राहत्या घराबाहेरुन चोरी झाली होती. मात्र अद्याप कारचा अजूनही शोध लागलेला नाही.

सीसीटिव्हीच्या मदतीने सध्या फरासखाना आणि शिवाजीनगर पोलिस या गाड्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणानंतर फॉर्च्युनर कार चोरणाऱ्या चोरट्यांपासून सावध रहा, असे आवाहन पुणे पोलिसांनी नागरिकांना केले आहे.