कोरेगाव भीमा प्रकरणाची कागदपत्रं आजच ताब्यात द्या, एनआयएची पुणे पोलिसांकडे मागणी

महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारमध्ये कोरेगाव भीमा प्रकरणाच्या चौकशीवरुन संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यातच आज केंद्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अधिकारी पुण्यात दाखल झाले आहेत (NIA demands Koregaon Bhima case documents).

  • योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे
  • Published On - 19:47 PM, 27 Jan 2020
कोरेगाव भीमा प्रकरणाची कागदपत्रं आजच ताब्यात द्या, एनआयएची पुणे पोलिसांकडे मागणी

पुणे : महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारमध्ये कोरेगाव भीमा प्रकरणाच्या चौकशीवरुन संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यातच आज (27 जानेवारी) केंद्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अधिकारी पुण्यात दाखल झाले आहेत (NIA demands Koregaon Bhima case documents). एनआयएच्या या पथकानं पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात कोरेगाव भीमा प्रकरणाच्या कागदपत्रांची तपासणीसाठी मागणी केली आहे. विशेष म्हणजे एनआयएचं पथक पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल झाल्यानंतर त्यांनी आजच कोरेगाव भीमा प्रकरणाची कागदपत्रं ताब्यात देण्याची मागणी पुणे पोलिसांकडे केली आहे (NIA demands Koregaon Bhima case documents).

एनआयएचे तीन अधिकारी मुंबईहून पुण्यात दाखल झाले आहे. त्यांनी आज दिवसभर या प्रकरणातील कागदत्रपत्रांची पाहणी केली. एनआयएच्या या आक्रमक पवित्र्यामुळे राज्यात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीच्या स्थापनेची मागणी करण्यात आली होती. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्रही लिहिलं होतं. मात्र, यानंतर तात्काळ केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिला. त्यामुळे या प्रकरणात काही संशयास्पद असल्याची शंका स्वतः शरद पवार यांनी व्यक्त केली. केंद्राने प्रकरण दिल्यानंतर अवघ्या दोन ते तीन दिवसांमध्येच एनआयएचं पथक पुण्यात दाखल झालं आहे.

केंद्र सरकारच्या या भूमिकेमुळे आता राज्य आणि केंद्र सरकारमधील संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. राज्य सरकारने याआधीच केंद्राचा हा निर्णय राज्याच्या अधिकारांवरील अतिक्रमण असल्याचं म्हटलं आहे. शरद पवार यांनी हा तपास एनआयएकडे दिला असला तरी पुणे पोलिसांच्या वर्तनाची चौकशी करुन इतरांना योग्य तो संदेश देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्य सरकार काय पाऊलं उचलणार हे पाहावं लागणार आहे.

शरद पवार काय म्हणाले होते?

कोरेगाव भीमा दंगलीमागे तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारचं षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला होता. तसेच या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी अशी मागणीही पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली होती.

भीमा कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची गरज आहे. कारण देवेंद्र फडणवीस सरकारने सत्तेचा चुकीचा वापर केला. फडणवीस सरकारने माध्यमांनाही चुकीची माहिती दिली. तसेच पोलिसांच्या मदतीने हे घडविलेले षडयंत्र होते. त्यांचा मुख्य सूत्रधारांना पाठीशी घालून जनतेची दिशाभूल करण्याचा डाव होता, असा आरोपही पवारांनी केला आहे.

संबंधित बातम्या :

केंद्राचा महाराष्ट्र सरकारला धक्का, भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे

शरद पवारांनी भीमा कोरेगावसंबंधी कागदपत्रं जाहीर करावी : प्रकाश आंबेडकर

भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्ह्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ‘हा’ महत्त्वाचा आदेश

कोरेगाव भीमा दंगल हे फडणवीस सरकारचं षडयंत्र, पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र : सूत्र