पुण्यातील बाणेरमध्ये भीषण आग, पॅनकार्ड इमारतीवरील डोम भक्ष्यस्थानी

बाणेर परिसरातील पॅनकार्ड क्लबच्या इमारतीवरील डोमला भीषण आग लागली आहे. आज सकाळच्या सुमारास या डोमला आग लागली. या घटनेत संपूर्ण डोम जळून खाक झाला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:39 PM, 6 Jan 2020
पुण्यातील बाणेरमध्ये भीषण आग, पॅनकार्ड इमारतीवरील डोम भक्ष्यस्थानी

पुणे : बाणेर परिसरातील पॅनकार्ड क्लबच्या इमारतीवरील डोमला भीषण आग लागली. आज सकाळच्या सुमारास या डोमला आग लागली. या घटनेत संपूर्ण डोम जळून खाक झाला आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही तास आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, अद्याप या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं नाही. ही आग कशी आणि का लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

बाणेर परिसरातील पॅनकार्ड क्लबची ही इमारत सर्वात मोठी इमारत आहे. या इमारतीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात पॅनकार्डचा व्यवहार केला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही इमारत बंद होती. या इमारतीत कुठलंही काम सुरु नव्हतं, इमारत पूर्णपणे रिकामी होती. मात्र, आज सकाळी (6 जानेवारी) या इमारतीवरील डोमला भीषण आग लागली. जवळपास 40 ते 50 फूट उंच इमारतीच्यावरील या डोमला अचानक आग लागली आणि परिसरात एकच खळबळ उडाली. या इमारतीत फायबरचं सामान असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या आगीमुळे आकाशात धुराचे मोठ मोठे लोळ उठले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी चारही बाजूने या इमारतीला घेरलं, जवानांनी ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आग खूप मोठी असल्याने त्यावर अद्याप नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आलेलं नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे देखील अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

Pancard Club Building Dom Fire