Income Tax Raid : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी करण्यापूर्वीच मोठ्या नेत्याच्या घरावर इन्कम टॅक्सचा छापा
Income Tax Raid : पुण्याच्या प्रभात रोडवर त्यांचं घर आहे. काही कागदपत्रांची तपासणी सुरु आहे. या घरातील महिलांनी काही बोलण्याचा प्रयत्न केला. पण इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रोखलं.

माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागानं छापा टाकला आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून इन्कम टॅक्स विभागाकडून ही छापेमारीची कारवाई सुरु आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सातारा, मुंबई आणि पुण्याच्या घरात इन्कम टॅक्सच पथक आहे. पुण्याच्या प्रभात रोडवर संजीवराजे नाईक निंबाळकर यांचं घर आहे. काही कागदपत्रांची तपासणी सुरु आहे. या घरातील महिलांनी काही बोलण्याचा प्रयत्न केला. पण इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रोखलं.
संजीवराजे नाईक निंबाळकर आधी अजित पवार यांच्यासोबत होते. पण विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता. आता पुन्हा ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार होते, त्याआधी ही छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे. कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांना या छापेमारी संदर्भात विचारण्यात आलं, त्यावेळी ते बोलले की, ‘मी काय भाष्य करणार?. तपास यंत्रणा आपलं काम करत आहेत’
कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र
“आजच्या कारवाईचा फलटण तालुका कार्यकर्ता संघातून निषेध करतो. ज्या संस्थानने सुरुवातीला 65 लाख रुपये आणि हजारो एकर जमीन शेतकऱ्यांना दिली. त्या घराण्याचा आज इन्कम टॅक्स छापा टाकून अपमान करत आहे. फलटण तालुका हे अजिबात सहन करणार नाही. आजची कारवाई घाणेरडी आणि राजकीय दृष्टीने झाली आहे. संजीवबाब निष्कलंक असून ते निर्दोष सुटणारच आहेत. लोकांचा असा अपमान करत असतील, तर फलटणची जनता निषेध करेल” अशी प्रतिक्रिया निंबाळकर यांच्या एका कार्यकर्त्याने दिली.
“ज्या राजघराण्यावर ही कारवाई सुरु आहे, त्या राजघराण्याला 900 वर्षांचा इतिहास आहे. भारताच्या जडणघडणीसाठी 1000 एकर जमीन आणि कित्येक किलो सोनं या घराण्याने दिलं. हा इतिहास आहे. देशाला स्वातंत्र्याकाळात मदत केली. अशा राजघराण्यावर राजकीय आकसापोटी कारवाई होत असेल, तर आम्ही कार्यकर्ते म्हणून निषेध करतो” असं एका कार्यकर्त्याने सांगितलं.