शरद पवारांच्या उपस्थितीत सांगलीचा माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार

माजी आमदार सदाशिव पाटील हे खानापूर आटपाडी मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

Sangli Ex MLA in NCP, शरद पवारांच्या उपस्थितीत सांगलीचा माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार

सांगली : सांगलीतील खानापूर-आटपाडीचे माजी आमदार आणि काँग्रेसला रामराम ठोकलेले ज्येष्ठ नेते सदाशिव पाटील आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सदाशिव पाटील राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतील. (Sangli Ex MLA in NCP)

सदाशिव पाटील हे खानापूर आटपाडी मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यापूर्वी विटा नगरपालिकेचे नगराध्यक्षपदही त्यांनी भूषवलं आहे.

सदाशिव पाटील हे काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष होते, मात्र चार महिन्यांपूर्वी त्यांनी काँग्रेसशी फारकत घेतली होती. विधानसभा निवडणुकीत सदाशिव पाटील यांनी खानापूर-आटपाडी मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.

सदाशिव पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. विद्यमान आमदार अनिल बाबर आणि माजी आमदार सदाशिव पाटील हे परंपरागत प्रतिस्पर्धी आहेत.

हेही वाचा : वंचितचे बंडखोर नेते लक्ष्मण माने पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर

अनिल बाबर यांनी यापूर्वी राष्ट्रवादीकडून 2004 आणि 2009 मध्ये निवडणूक लढवली होती. त्यावेळी सदाशिव पाटील यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवून सलग दोन वेळा अनिल बाबर यांचा पराभव केला होता.

2014 मध्ये बाबर यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला. 2014 आणि 2019 या दोन्ही वेळेस अनिल बाबर यांनी सदाशिव पाटील यांचा पराभव केला. अनिल बाबर हे शिवसेनेचे आमदार आहेत, मात्र जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांशी त्यांचे म्हणावे तितके जमत नाही.

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांची मिळून महाविकास आघाडी सत्तेवर आली आहे. अनेक जिल्ह्यात स्थानिक निवडणुकांमध्येही हे तिन्ही पक्ष एकत्र बघायला मिळत आहेत.

नुकत्याच झालेल्या सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमदार अनिल बाबर समर्थक शिवसेनेच्या सदस्यांनी भाजपला मतदान केल्यामुळे पुन्हा एकदा सांगली जिल्हा परिषदेत भाजपचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडून आले आहेत.

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील आजी-माजी आमदारांनी भाजपमध्ये प्रवेशाचा सपाटा लावला होता. मात्र निवडणुकीनंतर चित्र पालटलं आणि भाजपला सत्तेबाहेर बसावं लागलं. त्यामुळे आता पुन्हा सत्ताधाऱ्यांकडे ओढा वाढल्यास नवल वाटायला नको. (Sangli Ex MLA in NCP)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *