मोठी बातमी: संजय राठोडांचा पोहरादेवी दौरा लांबणीवर? प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याच्या आशा धुसर

संजय राठोड येत्या दोन ते तीन दिवसांत पोहरादेवी येथे येऊ शकतात. मात्र, ते नेमके कधी येतील, याबाबत आम्हाला कोणतीही माहिती मिळालेली नाही. | Sanjay Rathod in Pohradevi

मोठी बातमी: संजय राठोडांचा पोहरादेवी दौरा लांबणीवर? प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याच्या आशा धुसर
संजय राठोड, वनमंत्री

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे (Pooja Chavan Suicide) वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा पोहरादेवी दौरा लांबणीवर पडल्याची माहिती समोर आली आहे. संजय राठोड हे गुरुवारी पोहरादेवी येथे बंजारा समाजाचे नेते आणि धर्मगुरुंच्या साक्षीने आपली बाजू मांडणार, असे सांगितले जात होते. मात्र, आता हा योग लांबणीवर पडला आहे. (Sanjay Rathod poharadevi visit postphoned will not talk with media tomarrow)

पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज यांनी बुधवारी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना यासंदर्भात माहिती दिली. यापूर्वी महंत सुनील महाराज यांच्याकडून संजय राठोड 18 तारखेला पोहरादेवीला येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, सुनील महाराज यांनी यांनी तो दावा सोशल मीडियावरील माहितीच्याआधारे केला होता. संजय राठोड येत्या दोन ते तीन दिवसांत पोहरादेवी येथे येऊ शकतात. मात्र, ते नेमके कधी येतील, याबाबत आम्हाला कोणतीही माहिती मिळालेली नाही, असे महंत जितेंद्र महाराज यांनी स्पष्ट केले. सुनील महाराज आणि माझ्यात कोणतेही दुमत नाही, असेही त्यांनी सांगितले.

संजय राठोड हे 7 फेब्रुवारीपासून नॉट रिचेबल आहेत. गेल्या चार दिवसांपासून त्यांची गाडी मंत्रालयाच्या पार्किंगमध्ये उभी आहे. संजय राठोड यांचा कोणाशीच संपर्क नाही. माध्यमांनीही त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्कच होत नाही.

राठोडांच्या राजीनाम्याची माहिती चुकीची: राऊत

संजय राठोड यांनी मंगळवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा पाठवल्याची चर्चा होती. हा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडून स्वीकारला जाईल, असेही सांगितले जात होते. मात्र, शिवसेनेचा कोणताही नेता त्यावर स्पष्टपणे बोलायला तयार नाही. अखेर संजय राऊत यांनी हे वृत्त चुकीचे असल्याचा दावा केला.

वनमंत्री संजय राठोडांनी राजीनामा दिल्याची माहिती माझ्याकडे नाही. त्याबाबत मुख्यमंत्री माहिती देतील. त्याबाबत मी भाष्य करणं योग्य नाही. ती माहिती चुकीची आहे, असे संजय राऊत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना सांगितले होते.

पोहरादेवीचं महत्व काय?

वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असलेल्या संत सेवालाल महाराज, आई जगदंबामाता आणि राष्ट्रीय संत डॉ. रामराव महाराज यांच्या दर्शनासाठी देश विदेशातून भाविक येथे हजेरी लावलात.

पोहरादेवी येथे बंजारा समाजचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची समाधी आहे. नुकतंच ऑक्टोबर महिन्यात संत सेवालाल महाराजांचे वंशज आणि बंजारा समाजाचे धर्मगुरु डॉ. रामराव महाराज यांचं निधन झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते दिग्गजांनी रामराव महारांजांना श्रद्धांजली अर्पण केली होती.

डॉ. रामराव महाराज यांचे मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यानंतर त्यांचे पार्थिव वाशिमच्या मालेगाव येथे आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्या मूळगावी पोहरादेवी येथे त्यांचे पार्थिव आणण्यात आले. त्यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी एकच गर्दी झाली. संत सेवालाल यांचे वंशज असल्याने रामरावबापू महाराज यांच्यावर बंजारा समाजाची अपार श्रध्दा होती. इतरही समाजात त्यांना मान होता.

रामराव महाराजांनी 1948 मध्ये पोहरादेवी येथील गादीवर बसल्यानंतर अन्नत्याग केला. त्यानंतर ते फक्त कडूनिंब, दूध आणि फळांचे सेवन करत होते. गेल्या काही महिन्यांपासून दूध घेतानाही त्यांना त्रास जाणवत होता. त्यामुळे ते फक्त कडूनिंब आणि ज्यूस घेत होते. मात्र त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांची प्राणज्योत मालवली.

बंजारा समाज पाठिशी

दरम्यान, संजय राठोड यांच्या पाठिशी बंजार समाज उभा असल्याचं त्यांचे प्रतिनिधी सांगतात. बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी संस्थानच्या महंतांची काल बैठक पार पडली. यावेळी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधकांचं लक्ष्य ठरलेले बंजारा समाजाचे नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विरोधकांनी समाजाची बदनामी केल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

संबंधित बातम्या  

Sanjay Rathod Resignation Live Updates: संजय राठोड यांचा राजीनामा निष्पक्ष चौकशीसाठी: सूत्रांची माहिती

(Sanjay Rathod poharadevi visit postphoned will not talk with media tomarrow)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI