संजय राठोड पोहरादेवीला जाणार, पोलिसांचा चोख बंदोबस्त, प्रत्येक मार्गावर तपासणी, मंगळवारी काय होणार?

कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी पोहरादेवी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. (Sanjay Rathore Poharadevi Police force)

  • विठ्ठल देशमुख, टीव्ही 9 मराठी, वाशिम
  • Published On - 23:48 PM, 22 Feb 2021
संजय राठोड पोहरादेवीला जाणार, पोलिसांचा चोख बंदोबस्त, प्रत्येक मार्गावर तपासणी, मंगळवारी काय होणार?
अशा प्रकारे पोलीस बंदोबस्त आहे.

वाशिम : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर ते तब्बल 15 दिवसांपासून अज्ञातवासात होते. मात्र ते मंगळवारी सकाळी 11 : 30  च्या सुमारास वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथं येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मानोरा पोलिसांनी पोहरादेवी संस्थानला नोटीस बजावली आहे. कार्यक्रमावेळी फक्त 50 व्यक्तींनाच हजर राहण्याची परवानगी मानोरा पोलिसांनी दिली आहे. तसेच कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी पोहरादेवी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. येणाऱ्या सर्व मार्गांवर पोलीसांकडून तपासणी करण्यात येत आहे. (Sanjay Rathore will visit to Poharadevi strong Police force have been deployed)

पोलिसांची पोहरादेवीस संस्थानला नोटीस

संजय राठोड पोहरादेवी येथे आल्यानंतर मोठे शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे सध्या कोरोना संसर्ग वाढल्यामुळे सर्वत्र कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे पोहरागडावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. येथे कोणत्याही कार्यक्रमाला फक्त 50 जणांना जमण्याची परवानगी आहे. पोलिसांनी पोहरादेवी संस्थानला तशी नोटीसही बजावली आहे. तसेच, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक मार्गावर कसून तपासणी केली जात आहे.

तब्बल 15 दिवसांनंतर राठोड सर्वांसमोर येणार

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव आल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपासून संजय राठोड यांच्यावर टोकाची टीका होत आहे. भाजपने हा मुद्दा लावून धरलेला आहे. भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राठोड यांचे नाव आल्यानंतर ते अज्ञातवासात होते. त्यांचा नेमका पत्ता कोणालाही माहिती नव्हता. त्यामुळे या प्रकरणावर राठोड यांचे कोणतेही स्पष्टीकरण न आल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात होते. या पार्श्वभूमीवर तब्बल 15 दिवसांनंतर राठोड पहिल्यांदाच सर्वांसमोर येत आहेत. ते मंगळवारी पोहरा गडावर जाऊन पोहरादेवीचे दर्शन घेणार आहेत.

दरम्यान, राठोड यांचा दौरा जाहीर झाल्यानंतर पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यानंतर आनेक चर्चांना उधाण आले आहे. आता मंगळवारी पोहरादेवी गडावर काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर बातम्या :

Sanjay Rathod | शिवसेना नेते संजय राठोड सहकुटुंब पोहरादेवीला जाणार

(Sanjay Rathore will visit to Poharadevi strong Police force have been deployed)