औरंगाबाद : हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. आता त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत त्यांनी प्राचार्यांना शिवीगाळ केल्याचे दिसत आहे. या प्रकारानंतर त्यांच्यांवर विरोधकांकडून टीका होऊ लागली. यामुळे आता स्वत: संतोष बांगर यांनी पुढे येत स्पष्टीकरण दिले आहे.
माध्यमांशी बोलतांना संतोष बांगर म्हणाले की, त्या प्राचार्यांनी एका महिलेवरती अन्याय केला होता. त्यामुळे त्यांना जाब विचारला. त्या माहिलेवर अन्ययाच्या व्हिडिओची क्लीप माझ्याकडे आहे. आम्ही छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतो. महिलेवरील अन्याय संतोष बांगर सहन करणार नाही. सरकार आमचे असले तरी आवाज उठवावा लागतो. यासाठी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी मला त्याची पर्वा नाही. मी या घटनेची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे.
प्राचार्यांनी तक्रार का दिली नाही
संतोष बांगर यांनी प्राचार्यांसंदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे. हे प्रकरण आठ दिवसांपुर्वीचे आहे. आठ दिवसांत प्राचार्यांनी तक्रार का दिली नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. उठलं सुटलं की संतोष बांगर यांची दादागिरी असं तुम्ही म्हणता, परंतु प्राचार्य आणि उपप्राचार्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, तो अजूनही झाला नाही. अन्यायाविरोधात लढा देणं हे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवले आहे. आम्ही त्यांचे शिवसैनिक आहोत. त्यांनी अन्यायविरोधात आवाज उठवणे आम्ही शिकवले आहे,असे बांगर यांनी म्हटले.
काय आहे प्रकरण
एका पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राचार्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरुन समोर आला आहे. हिंगोलीजवळील एका शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्यांना आमदार बांगर यांनी मारहाण केल्याचे त्यात दिसत आहे. त्यावरुन आरपीआयच्या खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी संतोष बांगर यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
बांगर आणि वाद
संतोष बांगर यांनी यापुर्वी माध्यान्ह भोजन योजनेत जेवण पुरवणाऱ्या गोडाऊन व्यवस्थापकाला मारहाण केली होती. त्यानंतर विमा कंपनी कार्यालयात तोडफोड करुन कृषी अधिकाऱ्याला धमकावले होते. मंत्रालयात पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा त्यांचावर आरोप होता. आता एका प्राचार्याला कार्यकर्त्यांसह मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.