‘बिचुकलेंनी मतदार यादीसाठी नाव नोंदणी केली नाही, त्यांच्या आरोपात तथ्य नाही’, जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा

जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करत अभिजीत बिचुकलेंच्या आरोपांवर खुलासा केला आहे (Satara Collector Shekhar Singh on Abhijeet Bichukale allegations).

  • संतोष नलावडे, टीव्ही 9 मराठी, सातारा
  • Published On - 19:34 PM, 1 Dec 2020

सातारा : पुणे पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांनी पदवीधर मतदार यादीत नाव नोंदणी केली नाही. त्यामुळे त्यांचे मतदार यादीत नाव आलं नसल्याचा खुलासा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करत खुलासा केला आहे (Satara Collector Shekhar Singh on Abhijeet Bichukale allegations).

अभिजीत बिचुकले यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचित करताना प्रशासनावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत मतदार नोंदणी अर्जाची पडताळणी केली. यामध्ये बिचुकलेंनी नाव नोंदणी केले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आलं, असं पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.

“अभिजित बिचुकले यांच्याकडे नाव नोंदणीचा कोणताही पुरावा नाही”, असंदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रात नमूद केलं आहे. त्यामुळे बिचुकले यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे (Satara Collector Shekhar Singh on Abhijeet Bichukale allegations).

बिचुकले आज (1 डिसेंबर) सकाळी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेज याठिकाणी मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले होते. त्यावेळी मतदार यादीत त्यांच्या पत्नी अलंकृता बिचुकले यांचे नाव होते. मात्र त्यांच्या नावाखाली अभिजीत बिचुकलेंचे नाव नसून नारायण बिचुकले असे दुसऱ्याच व्यक्तीचे नाव होते.

यानंतर अभिजीत बिचुकले यांनी मतदान यादीत नाव नसल्याचे समजल्यानंतर काही वेळ बूथवर गोंधळ घातला. या सर्व यंत्रणेचे खापर त्यांनी भाजपवर फोडले.

“मामा माझं या यादीत नाव नाही. उमेदवाराचं नाव नाही, तर सर्वसामान्यांचं काय. कोणीही येऊन XYZ तिथे येऊन मतदान करेल. सर्व आपले बंधूभाव आहेत. मी कधीही जातीवर राजकारण केलं नाही. यांनी स्वत:ची नावं लिहिली. माझी नोंदणी झाली आहे. बायकोचं नाव आहे. पण माझं नाही. मी उमेदवार आहे. त्यामुळे मला निवडणुकीपासून वंचित राहावं लागणार आहे. हा निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार आहे,” अशी प्रतिक्रिया अभिजीत बिचुकले यांनी दिली होती.

“पण निवडणूक आयोग अशाप्रकारे भोंगळ कारभार करत असेल, तर अवघड आहे. यंत्रणा या याद्या पुरवत होते, किंवा कोणत्या पक्षाच्या कोणत्या नेत्याच्या याद्या करत होते, निवडणूक आयोग कसा फॉलोअप घेत होता हे मला माहिती नाही. पण यात काहीतरी षडयंत्र आहे. उमेदवाराचं नाव नसणं हा भोंगळ कारभार नाही का? कोणता पक्ष आहे, हे यात शोधलं पाहिजे. भाजपने या याद्या बनवल्या आहेत,” असा आरोप अभिजीत बिचुकले यांनी केला होता.

संबंधित बातमी :

पुणे पदवीधरचे उमेदवार अभिजीत बिचुकलेंना मतदानाआधीच धक्का