Satara Doctor Death : बेटी पढी पर बची नही… संपदाला न्याय देण्यासाठी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन, मुंबईपासून संभाजीनगरपर्यंतच्या हॉस्पिटलमध्ये आरोग्य सेवा कोलमडली

फलटण येथील डॉक्टर महिलेच्या आत्महत्येनंतर राज्यभरातील डॉक्टर संघटना संतप्त झाल्या आहेत. डॉक्टरांना न्याय मिळावा आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, या मागणीसाठी नायर रुग्णालयासह अनेक ठिकाणी काम बंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे रुग्णसेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली असून, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Satara Doctor Death : बेटी पढी पर बची नही... संपदाला न्याय देण्यासाठी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन, मुंबईपासून संभाजीनगरपर्यंतच्या हॉस्पिटलमध्ये आरोग्य सेवा कोलमडली
डॉक्टरांचे कामबंद आंदोलन
| Updated on: Nov 03, 2025 | 10:54 AM

साताऱ्यातील फलटण येथील एका रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर महिलेने आत्महत्या केली, ते प्रकरण अजूनही तापलं आहे. त्या डॉक्टरने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोटू लिहून दोघांची नावे नमूद केली, त्यांना अटकही करण्यात आली. मात्र फलटणमधील डॉक्टर महिलेच्या मृत्यूनंतर राज्यभरात डॉक्टरांच्या विविध संघटनानंकडून काम बंद आंदोलन केलं जात आहे. या आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप डॉक्टरांचा आहे. डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याची मागणी डॉक्टर संघटनांकडून केली जात आहे. काम बंद आंदोलनामुळ आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता आहे.

नायर रुग्णालयात डॉक्टर आक्रमक

दरम्यान डॉ. संपदा मुंडे प्रकरणी मुंबईतील नायर रुग्णालयात डॉक्टर आक्रमक झाले असून ओपीडी पूर्णपणे बंद करत रुग्णालय परिसरात आंदोलन सुरू केले आहे. फलटण येथील डॉ. संपदा मुंडे आत्महत्येनंतर राज्यभरात वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट आहे. मुंबईतील नायर रुग्णालयात रेसिडेंट डॉक्टर आणि एमडी विद्यार्थीने आंदोलन सुरू केले. बेटी पडी पर बची नहीं “नो सेफ्टी, नो सर्विस!” अश्या आशयाचे पोस्टर हातात घेत रेसिडेंट डॉक्टर आणि एमडी विद्यार्थी आंदोलनात उतरले आहेत.

गेट नंबर 1 परिसरात नायर मार्ट संघटनेकडून आंदोलन सुरू असून “डॉ. मुंडेंना न्याय मिळालाच पाहिजे” अशी भूमिका घेण्यात आली आहे. या प्रकरणात रिटायर्ड न्यायाधीश आणि महिला सदस्याचा समावेश करत एसआयटी नेमावीअशी डॉक्टरांची मागणी आहे. संपदा मुंडे हिच्या कुटुंबाला 5 कोटींची मदत, जलदगती कोर्टात सुनावणी, आणि डॉक्टरांवरील कामाचा ताण कमी करावा अशा मागण्याही आहेत. आंदोलन सुरू असल्याने रुग्णालय परिसरात ओपीडी सेवा ठप्प झाली आहे, फक्त इमर्जन्सी विभाग सुरू असून त्यामुळे रुग्णांना मोठा फटका बसत आहे. आज फक्त ओपीडी सेवा बंद, पण न्याय न मिळाल्यास उद्या पासून इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करू असा इशारा डॉक्टरांनी सरकारला दिला असून प्रशासनावर डॉक्टरांचा रोष दिसून येत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्येही मार्डचं काम बंद आंदोलन

डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर घाटीतील मार्ड या संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता ओपीडी आणि इतर सेवा बंद करण्यात आली. बंद पुकारल्याने रुग्ण सेवेवर परिणाम होणार आहे. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा या मागणीसाठी मार्ड संघटनेचे सर्व डॉक्टर आक्रमक झाले आहेत.